सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव, बेलगाव, धामणी, गंभीरवाडी, भरविर अधरवड, टाकेद, खेड, साकूर व पिंपळा डुकरा या परिसरात बुधवारी (दि.१७) सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात भात हे खरीप हंगामाचे मुख्य पीक असून हेच पीक अवकाळीने हिसकावून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास आपल्या पदरात पडेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. तसेच लाखो रुपये खर्च करून टोमॅटो, फ्लावर्स व इतर भाजीपाला पिकांसाठी केलेला लागवड खर्चदेखील पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी टाकेदचा आठवडे बाजार भरतो. परंतु अचानक आलेल्या पावसाने साऱ्यांची एकच धांदल उडाली. सध्या शेतात सोंगून ठेवलेलेले भातपीक भिजले आहे. काही खळ्यांत भात बडवून तयार करून ठेवलेले धान्य झाकण्यासाठी तारांबळ उडाली.
कोट....
अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून त्याचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. पीक विमा कंपनीने कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता शेतकऱ्यांची ऑनलाइन तक्रार नोंदवून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
- समाधान वारुंगसे, उपाध्यक्ष, युवा शिवसेना, इगतपुरी तालुका