नाशिक : ‘गोड नाम विठुबाचे...’, ‘माझे माहेर पंढरी...,’ ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...,’ ‘विसावा विठ्ठल..,’ अशा एकापेक्षा एक सरस विठुरायाचे अभंग विविध रागांमध्ये आपल्या सुमधुर आवाजात अन् बहारदार शैलित सादर करत गायक कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी अन् रंजनी-गायत्री यांनी मैफल उत्तरोत्तर खुलविली. यावेळी उपस्थित श्रोते विठुमाउलीच्या भक्तिरसात न्हाऊन निघाले. निमित्त होते, पंचम निषाद व फ्रेण्ड््स सर्कलच्या वतीने शनिवारी (दि.२१) दादासाहेब गायकवाड सभागृहात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्या मैफलीचे. विठुनामाचा जयघोष करीत ‘जयजय रामकृष्ण हरी...’च्या गजराने मैफलीला प्रारंभ करण्यात आला. सहभागी चारही गायकवृंदांनी सामूहिकरीत्या उपस्थित वाद्यवृंदाच्या सुरेख साथीने केलेल्या विठुनामाच्या गजराने अवघ्या सभागृहात विठुरायाच्या भक्तीचा जागर केला अन् उपस्थित श्रोत्यांचा भक्तीचा उत्साह सळसळता ठेवला. विठुमाउलीच्या गजरानंतर भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय व लोकप्रिय संगीतावर विशेष पकड असलेल्यामेवुंडी यांच्या गायनाने समारोपकिराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘विसावा विठ्ठल, सुखाची सावली...’ या रचनेने त्यांच्या गायन सत्राला प्रारंभ क रताच उपस्थित भाविक विठुमाउलीच्या भक्तीत तल्लीन झाले. ‘आकार-उकार, मकार करिती हा विचार’ हा अभंग उत्स्फूर्त दाद मिळवून गेला. संत तुकारामांची रचना असलेला ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा...’ हा अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर तीर्थ विठ्ठल या अभंगाद्वारे उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मेवुंडी यांनी अशाप्रकारे विविध रचना आपल्या बहारदार शैलित सादर करत मैफलीचा समारोप केला.
विठूनामाच्या गजरात रंगले अभंगगान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:13 AM