नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या विश्वविक्रमी टाकचे मंगळवारी (दि.१६) शाळकरी मुलींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अशा प्रकारे सलग तीन वर्ष विश्वविक्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती सेनेकडून अनोखी मानवंदना देण्यात आली आहे.
शिवजन्मोत्सव २०२१ च्या पार्श्वभूमीवर छत्रपती सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विश्वविक्रमी टाक तयार केला असून सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे या टाकचे अनावरण करण्यात आले. टाक तयार करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून काम सुरू होते. यात तांबे, पितळ यासारख्या धातुंचा वापर करण्यात आला असून संपूर्ण टाकचे वजन हे ७० किलो आहे. ‘शिवराय मनामनात, शिवराय घराघरात’ या संकल्पनेतून हा टाक साकारण्यात आला असून त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) येथे झाली आहे. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करीत छत्रपती सेनेतर्फे विश्वविक्रम नोंदविण्याचे यावर्षी तिसरे वर्ष आहे. संघटनेकडून यापूर्वी २०१९ मध्ये जिरेटोप , २०२० मध्ये भवानी तलवार आणि २०२१ मध्ये टाक साकारण्यात आला आहे. याप्रसंगी चेतन राजापूरकर , वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकारी एमी चढ्ढा यांच्यासह छत्रपती सेनेचे अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार, कोअर टीम अध्यक्ष तुषार गवळी, उपाध्यक्ष राजेश पवार , संदीप निगळ , डॉ. श्याम थविल, डॉ. जितेश पाटील ,किशोर तिडके , जितेंद्र आहेर ,धीरज खोळंबे, अविनाश पाटील, डॉ. विशाल गवळी, महिला जिल्हा संपर्क प्रमुख ॲड. विद्या चव्हाण , छत्रपती महिला आघाडी प्रमुख पूजा खरे , धनश्री वाघ ,ऋतुजा काकडे आदी उपस्थित होते.