मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ व २१ मध्ये सन २०१७ ते आतापर्यंत झालेल्या विकासकामांची महिनाभराच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना दिले आहेत. माजी आमदार आसिफ शेख यांनी गेल्या २७ मे २०२१ रोजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन प्रभाग क्रमांक १८ व २१ मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. नगररचना विभागाला याबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगर विकास विभागाचे उपसचिव जाधव यांनी मनपा आयुक्त गोसावी यांना पत्र पाठवून झालेल्या विकासकामांची चौकशी करून महिनाभराच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग १८ चे प्रतिनिधीत्व एमआयएमचे माजिद युनूस इसा तर २१ चे प्रतिनिधीत्व डॉ. खालिद परवेझ करीत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असल्याने शहराचे राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे. त्याची ही रंगीत तालीम मानली जाते.
मालेगावी विकासकामांच्या चौकशीचे नगरविकासचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 1:02 AM