नाशिक : लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याचे सांगणारे माओवादी हे लोकांवर लढा लादून स्वत:ची राजकीय सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. माओवाद्यांनी भारताविरुद्ध लढा उभारून त्याला ‘क्रांती’ असे नाव देत शहरी भागाची मदत मिळविण्यासाठी शहरी माओवाद पसरविण्यास सुरुवात केली, ही देशापुढील मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन भारतीय सैन्याच्या कोअर आॅफ इंजिनियर्स विभागातून निवृत्त झालेल्या कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प गायकवाड यांनी बुधवारी (दि.१२) गुंफले. ‘माओवाद आणि अंतर्गत सुरक्षा’ या विषयावर बोलताना त्यांनी माओ विचारसरणीतून जन्माला आलेला नक्षलवाद, काळानुरूप बदलत गेलेली युद्धनीती व स्वरूप, जंगलात जन्मलेला नक्षलवाद व माओवाद शहरी माओवाद बनला असून, त्यांची ध्येय, उद्दिष्ट्ये यांचा चौफेर आढावा घेतला. यावेळी गायकवाड म्हणाल्या, ७०च्या दशकात कोंडापल्ली सीतारमय्या याने शहरी नक्षलवादासाठी पीपल्स फ ॉर ग्रुप ही संघटना चालविली.१९८०-९५ हा कालावधी सीतारमय्याने चांगलाच गाजविला; मात्र त्यानंतर त्याला फारसे बळ मिळाले नाही. कारण नक्षलवादी, माओवादी संघटना या विखुरलेल्या होत्या. मात्र २००१ नंतर भारत हा मोठा शत्रू मानत सुमारे ४० पेक्षा अधिक संघटना भारताविरोधी लढ्यासाठी एकत्र झाल्या. २००४ पासून त्यांच्या भारताविरोधी लढ्याला अधिकच बळ मिळत गेले. त्यांनी या लढ्याला क्रांती असे संबोधले. पारंपरिक हत्यारांचा वापर करणारे माओवादी हे २००४ नंतर सैनिकी प्रशिक्षण घेऊन आधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झाले. आताची लोकशाही ही लोकांची नाही, असे सांगून माओवाद्यांनी भारताची शासकीय यंत्रणा आणि संविधानाला उद्ध्वस्त करण्याचे अंतिम ध्येय ठेवले आहे, असे गायकवाड यांनी यावेळी अधोरेखित केले.कोरेगाव-भीमा दंगलीमागे शहरी माओवादकोरेगाव-भीमा दंगलीमागे शहरी माओवाद विचार तपासी यंत्रणांच्या माध्यमातून पुढे आला आहे. या दंगलीचे धागेदोरे पुण्याच्या शनिवारवाड्यात झालेल्या एल्गार परिषदेशी जोडलेले असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. कोरेगाव-भीमामध्ये एल्गार परिषदेने दहशत पसरविली. या परिषदेच्या आयोजनामागे असलेल्या संघटनांनी ‘आजच्या पेशवाईशी लढण्यासाठी कंबर कसा’, ‘भीमा कोरेगावने दिला धडा, नवी पेशवाई म्हसणात गाडा’ अशी टॅगलाइनची पत्रे वाटली. आंबेडकरवादी संविधानविरोधी कधीच असू शकत नाही, जे संविधानविरोधी आहेत केवळ माओवादीच, असे गायकवाड म्हणाल्या.
शहरी माओवाद घातक समस्या : स्मिता गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:07 AM