फक्त शहरी भागापुरता असलेला पक्ष असे वारंवार म्हटल्या गेलेल्या भाजपने मात्र यंदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील उत्तम कामगिरी केल्याने चार जागा तर त्यांनी राखल्याच परंतु बागलाणची जागा बोनस मिळाली आहे. भाजपच्या स्थापनेनंतर नाशिक जिल्ह्यात प्रथमच पाच जागा जिंकण्याचा विक्रम यंदा झाला आहे. अर्थात ग्रामीण भागापेक्षा अटीतटीच्या लढतीतदेखील शहरी भागातील मतदारच निर्णायक ठरला.युतीच्या जागावाटपात भाजपने एकूण सहा जागा लढविल्या होत्या. यात नाशिक शहरात तीन, तर ग्रामीण भागात देवळा-चांदवड, बागलाण आणि मालेगाव मध्य अशा सहा जागा लढवल्या होत्या. यात मालेगाव मध्य मध्ये लता वारुळे यांची उमेदवारी औपचारिकताच होती. बाकी मात्र सर्वच ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिले असली तरी निवडणुकीत मोठी आव्हाने उभी होती. नाशिक पूर्वमध्ये भाजपने आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपातील छुपी फूट मोठे आव्हान होते. सानप हे भाजपचे दीड दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे पालकमंत्र्यांची या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. सानप यांना छुपी रसद अनेक ठिकाणाहून मिळत होती त्यातच मित्रपक्ष शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सानप यांची भेट घेतल्याने वेगळेच चित्र निर्माण झाले मात्र असे असतानाही राहुल ढिकले यांचा विजय अवघड असताना तो मिळाला. नाशिक पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे यांना मात्र शिवसेनेचे मोठे आव्हान होते. मित्रपक्ष शिवसेनेनेच बंडखोर उभा करून पुरस्कृत केले. त्याचबरोबर राष्टÑवादी, मनसे आणि माकपा यांचेदेखील आव्हान होते. मात्र त्यालादेखील पुरून उरत भाजपने विजयाचा मार्ग सुकर केला. नाशिक मध्य मतदारसंघात तसे आमदार देवयानी फरांदे यांना आव्हान नाही असे मानले गेले तरीही कॉँग्रेस आणि मनसेने ते निर्माण केले. परंतु त्यानंतरदेखील त्या विजयीच झाल्या. शहरी भागातील अटीतटीच्या एकूण लढतीत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कांदा निर्यातबंदी आणि अन्य काही विषयांचे मोठे आव्हान होते. बागलाणसारखा अनुसूचित जमातींसारख्या मतदारसंघात आदिवासी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच येथे सभा घेऊन कांदा निर्यातबंंदी हटविण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही, असे आश्वासन दिल्याने या भागातील मते मात्र भाजपला मिळाली. चांदवड मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार जाहीर सभेत घोषित करणे हेदेखील वातावरण अनुकूल करण्यास उपयुक्तठरले.
भाजपच्या लक्षणीय यशात शहरी मतदारच निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 1:38 AM