नाशिक :भारतातील अमेरिकेचे वाणिज्य दुत डेविड रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह तपोवन परिसरात भेट देत पाहणी केली.
डेविड यांनी २७ ऑगस्ट २०१९ साली भारतात अमेरिकेचे वाणिज्य दुतचा (कॉन्सल जनरल) पदभार स्विकारला आहे. त्यांचे मुंबई येथे मुख्य कार्यालय आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक कामगिरीसाठी त्यांना २००४ साली अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हार्बट सालझमन पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच युएस आर्मी कमांडर ऑफ पब्लीक सर्वीसेसचा पुरस्कारही देण्यात आला होता.रॅन्झ हे त्यांच्या पत्नी परराष्ट्र सेवा अधिकारी टॅली लिंड यांच्यासोबत नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर रविवारी आले होते. त्यांनी काळाराम मंदिराला भेट दिल्यानंतर रामकुंडावर हजेरी लावली. यावेळी महंत सुधीरदास पुजारी, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हेदेखील उपस्थित होते. रॅन्झ यांनी यावेळी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व व कुंभमेळ्याची माहिती महंत सुधीरदास यांच्याकडून जाणून घेतली. पुरोहित संघ व गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सपत्नीक पायी फेरफटकाही गोदाकाठावरील गांधी तलाव, देवमामलेदार मंदीर परिसर, निळकंठेश्वर मंदीर, दुतोंड्या मारुतीची भव्य मुर्ती न्याहाळत येथील आकर्षक कलाकुसर असलेल्या पुरातन मंदिरांसमोर आपली छबीदेखील मोबाईलने टिपली. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी यावेळी परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त पुरविला