नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीला स्नानाच्या विविध ठिकाणी अत्याधुनिक फूटमॅट बसवून त्याद्वारे भाविकांची संख्या मोजण्याचा प्रयोग शुक्रवारी पावसामुळे फसला. गेल्या पर्वणीला या प्रयोगाद्वारे सुमारे तीन लाख भाविकांची शास्त्रशुद्ध मोजणी करण्यात आली होती. कुंभमेळ्याच्या पर्वणीला विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेत किती भाविकांची गर्दी झाली, याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग पहिल्या दोन्ही पर्वण्यांना राबवण्यात आला. पैकी पहिल्या पर्वणीला ७५ हजार भाविकांची मोजणी करण्यात आली, तर दुसऱ्या पर्वणीत हा प्रयोग आणखी व्यापक करण्यात आला व शहरातील पाच घाटांवर भाविकांच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी (एक्झिट पॉइंट्स) फूटमॅट बसवण्यात आले. त्यात लक्ष्मीनारायण घाटावर दोन, तर रोकडोबा पटांगण, अमरधाम, घारपुरे घाट येथील प्रत्येकी एका फूटमॅटचा समावेश होता. ‘फूटमॅट’ हे तंत्रज्ञान मॉल्समध्ये वापरले जाते; मात्र तेथे एका रांगेत जाणाऱ्या लोकांचीच मोजणी होते. कुंभमेळ्यात मात्र असे शक्य नसल्याने विराज रानडे, परीक्षित जाधव, नीलय कुलकर्णी व हिरेन पंजवाणी चौघा तरुणांनी वेगळे तंत्रज्ञान विकसित करीत रस्त्याच्या आकाराचे- साधारणत: ८ मीटर बाय दीड फूट या आकाराचे ‘फूटमॅट’ तयार केले. या प्रकल्पाला ‘कुंभथॉन’नेही सहकार्य केले. काळ्या रबराच्या फूटमॅटमध्ये विशिष्ट सेन्सर्स बसवण्यात आले. त्यावरून भाविक चालत गेल्यास त्यांचे आपोआप मोजमाप होऊन त्यांची संख्या संबंधित संकेतस्थळावर झळकते. तसेच अॅपवरही उपलब्ध होते. त्यानुसार दि. १३ रोजी सायंकाळपर्यंत सदर पाच ठिकाणे मिळून तीन लाख भाविकांची मोजणी झाली होती. हाच प्रयोग तिसऱ्या पर्वणीतही अवलंबला जाणार होता; मात्र पहाटेपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे ते शक्य होऊ शकले नाही. एक-दोन ठिकाणी फूटमॅट बसवण्यात आले; मात्र त्यावरून पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ते काढून घेण्यात आले. (प्रतिनिधी)
पावसामुळे फसला फूटमॅटचा प्रयोग
By admin | Published: September 19, 2015 10:27 PM