लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत स्वपक्ष किंवा मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध निवडणूक लढविणाऱ्या बंडखोरांना पक्षनेत्यांनी गद्दार म्हणून संभावना करीत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देऊनही सर्वच बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून, उलट स्वत:च्या प्रचारपत्रकांवर पक्षनेत्यांच्या छायाचित्राचा वापर करून मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न चालविला आहे. बंडखोरांच्या या चालीमुळे अधिकृत उमेदवारांची आणखी डोकेदुखी वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या अनेक आमदार, पदाधिकाऱ्यांनी राजकीय भवितव्य आजमाविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे करून काहींनी भाजप, तर काहींनी सेनेत प्रवेश केल्याने राज्यातील वातावरण निवडणुकीपूर्वी एकतर्फी फिरल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन्ही पक्षांमध्ये इन्कमिंग होत असल्याचे पाहून पक्षातील मूळ पदाधिकारी तसेच निवडणूक इच्छुकांची अस्वस्थता व्यक्त केली गेली. मात्र पक्ष उमेदवारी देताना विचार करेल यावर विश्वास असल्याने पर पक्षातील लोकांना आपलेसे करून घेण्याचा मोठेपणा इच्छुकांनी दाखविला असला तरी, प्रत्यक्षात उमेदवारी वाटताना शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागली. त्यातही जागावाटपाचा कळीचा प्रश्न सोडविताना दोन्ही पक्षांची पुरती दमछाक झाली. त्यामुळे जागा व उमेदवारी न मिळालेल्यांनी निवडणुकीत थेट नामांकन दाखल करून बंडाचा झेंडा हाती घेतला. पक्षाकडून एकतर उमेदवारी मिळेल किंवा पुढील राजकीय सोयीचे पद अशी अपेक्षा बाळगून असलेल्या बंडखोरांना पदरात मात्र अखेरच्या क्षणापर्यंत काहीच पडले नाही. त्यामुळे माघारीच्या दिवशी सर्वच बंडखोर ‘नॉट रिचेबल’ होवून त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणारे भाजपचे रत्नाकर पवार यांनी आपल्या प्रचारपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह भाजपच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांचेही छायाचित्र वापरून प्रचार पत्रके घरोघरी वाटले आहेत. तशीच परिस्थिती नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांची असून, त्यांच्या प्रचारात तर शिवसेनेचे नगरसेवक, महानगरप्रमुख, प्रमुख पदाधिकारी उघड उघड प्रचारात सहभागी झाले असून, शिंदे यांच्या प्रचारपत्रकावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या नेत्यांची छबी तसेच स्थानिक सेनेच्या पदाधिकाºयांचे छायाचित्रे व नावाचा खुलेआम वापर करण्यात आला आहे. इगतपुरीत भाजपचे शिवराम झोले यांच्या पत्नीने बंडखोरी केल्याने त्यांनीही भाजपच्या नेत्यांचा सहारा घेतला आहे.