मास्कचा योग्य वापर करणे, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात स्वच्छ धुणे या त्रिसुत्रीच्या अंमलबजावणी व जनजागृतीकरिता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय गुरुवारीही संध्याकाळी फौजफाट्यासह जुन्या नाशकातील रस्त्यावर उतरले. पाण्डेय यांनी सरस्वती लेन चौकापासून संध्याकाळी सात वाजता पाहणी दौरा सुरु केला. भद्रकाली परिसर, नाशिक सेंट्रल भाजी मार्केट, शहीद अब्दुल हमीद चौकातून पुढे दुध बाजार, फाळकेरोड, चौकमंडई थेट चौकमंडई, बागवानपुरा, महालक्ष्मी चाळ, द्वारका चौकापर्यंत पाहणी दौरा करत दुकानदार, ग्राहकांना मास्कचा वापर करावा, दुकानांमध्ये गर्दी होऊ न देणे याविषयी सुचना केल्या. या पाहणी दौऱ्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्यावर्षाप्रमाणेच मार्चपासून परिस्थिती भयावह होऊ नये, यासाठी प्रशासनाने हालचाली गतीमान केल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर पाण्डेय यांनी बाजारपेठांना अचानकपणे भेट देत पायी पाहणी दौरा केला. यावेळी पाण्डेय मास्कविना वावरणारे बहुतांश लोक आढळून आले. त्यांनी यावेळी संबंधितांना मास्क दिले तर काहींना पोलीस वाहनातून तपासणीसाठी हलविण्याच्या सुचनाही कर्मचाऱ्यांना केल्या. यावेळी उपायुक्त संजय बारकुंड (गुन्हे), विजय खरात, सहायक आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या दौऱ्यात सहभाग घेतला.
----इन्फो---
भाजीवाल्या काकुंसोबत संवाद
भद्रकाली मार्केटमध्ये पाण्डेय यांनी प्रवेश करत तेथील एका भाजीविक्रेत्या काकूंसोबत संवाद साधला. यावेळी पाण्डेय यांनी त्यांना ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दलही विचारपूस केली. तसेच त्यांना मास्क देत स्वत:चे आरोग्य जपण्याचाही सल्ला दिला.
---इन्फो--
हॉटेलचालक, फळविक्रेत्यांना तंबी
सात वाजेपासून पाण्डेय यांनी दंगलनियंत्रण पथकाच्या तुकडीसह भद्रकाली पोलिसांच्या फौजफाट्यासह परिसरात पायी दौरा सुरु केला.भद्रकाली, दुधबाजार या बाजारपेठेत पाण्डेय यांनी दुकानांचेही निरिक्षण केले. यावेळी काही दुकानदारांना दुकानांमध्ये ग्राहकांची जास्त गर्दी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच ग्राहकांना तत्पर सेवा द्या, गर्दी होऊ देऊ नका अन्यथा दुकान सील करु अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.
----
फोटो : १८पीएचएमआर ९४/९६