पेठ -दुधाला भाव मिळत नाही यामुळे मागील महिन्यात राज्यात मोठया प्रमाणावर दुध आंदोलन छेडण्यात आले होते. शेतकरयांची मागणी मान्य झाली असली तरी खरेदी केलेल्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शासनासमोर होता. यावर उपाय म्हणून आता शासनाने खरेदी केलेल्या दुधाची पावडर तयार करून त्याचा शालेय पोषण आहारात पुरक आहार म्हणून वापर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात सद्या राज्यात उद्भवलेल्या अतिरिक्त दुध व दुधाच्या भुकटीवर उपाय म्हणून आगामी तीन माहिण्यासाठी राज्यातील शालेय पोषण आहार पात्र शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्याथ्र्यांना दुध भुकटीचे पाकीटे पुरण्यात येणार आहेत. एक महिण्यासाठी प्रति विद्यार्थी 200 ग्रॅम प्रमाणे तीन महिण्यासाठी तीन पाकीटे विद्यार्थ्याच्या घरी देण्यात येणार असून त्यापासून दुध तयार करण्याबाबत प्रशिक्षण शिक्षक व पालकांना वाटप करतांना देण्यात येणार आहे.
शाळेत दुधभुकटीचे पाकीटे प्राप्त झाल्यानंतर शाळा प्रशासनाने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांसमवेत दुध भुकटी वाटप दिवस साजरा करावयाचा आहे. याच दिवशी दुध भूकटीपासून दुध तयार करण्याचे प्रात्यक्षिक पालकांना देण्यात यावे अशा सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणाऱ्या या योजनेच्या संनियत्रणासाठी राज्यस्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. शिक्षण संचालक ( प्राथ.) पुणे हे या योजनेचे राज्य समन्वयक म्हणून कामकाज पाहतील.