नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर २०२१ परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या ३९० विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांची प्रकरणे परीक्षा गैरप्रकार समितीसमोर ठेवण्यात आली असून चौकशी समितीच्या निर्णयानंतर संबंधितांच्या निकालावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या ६७ विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दि. ८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. या परीक्षेत कोणतेही अनपेक्षित गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्याच्या प्रत्येक हालचालीवर ऑनलाईन माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्याला प्रमाद समितीला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा विभागाने दिली आहे. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये यापूर्वी २१ डिसेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीतही प्रॉक्टर पद्धतीचा वापर करण्यात आला होता. या परीक्षेत सुमारे ४१ हजार ८०३ परीक्षार्थी आणि १ लाख १६ हजार ५५५ उत्तरपुस्तिका होत्या. यात सॉफ्टवेअरद्वारे प्रॉक्टर पद्धतीतून ३९० विद्यार्थ्यांनी ५ पेक्षा अधिक वेळा इशारा देऊनही गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. परीक्षा गैरप्रकार समितीसमोर ही प्रकरणे ठेवण्यात आली असून, चौकशी समितीच्या निर्णयानंतर संबंधितांच्या निकालावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाने सांगितले..विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सहायविद्यापीठाच्या विविध आठही विभागीय केंद्रावर प्रत्येकी ०४ तांत्रिक सहायकांची विद्यार्थ्यांच्या तांत्रिक सहाय करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली असून, त्याची यादी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, पीपीटी, डेमो लिंक, डेमो व्हिडिओ इत्यादी माहिती तसेच या परीक्षेचे सर्व शिक्षणक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठ पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार न करता, भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी केले आहे.
परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या ३९० विद्यार्थ्यांचा निकाल रोखला मुक्त विद्यापीठाकडून प्रॉक्टर पद्धतीचा वापर : ८ फेब्रुवारीपासून ६७ अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2022 12:14 AM