नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग मंगळवारी (दि. २३) राबविला; मात्र हा प्रयोग पहिल्या चार तासांतच फ सला. वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेला नाशिककरांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत दुहेरी वाहतूक मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती. कारण शासकीय कन्या विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता विकसित केला जात आहे. अशाच पद्धतीने सीबीएस ते त्र्यंबक नाक्यापर्यंतचा रस्ता विकसित केला जाणार असल्याने तत्पूर्वी पोलिसांनी या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न मंगळवारी केला; मात्र हा प्रयत्न शहर वाहतूक शाखेच्या अंगलट आला आणि वाहतूक पोलीसही गोंधळात सापडले. सीबीएस चौकात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.मुंबई नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी नव्या अधिसूचनेनुसार प्रवेश दिला जात होता; मात्र शालिमारकडून डावीकडे तसेच शरणपूररोडवरून सीबीएस सिग्नलवरुन उजवीकडे वळण घेत त्र्यंबक नाक्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे सीबीएस चौकात वाहतूक कोंडी झाली. परिणामी शरणपूररोडवरही वाहनांच्या रांगा लागल्या. तसेच शालिमार-सीबीएस रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे नाशिककरांनी पोलिसांच्या नियोजन व नव्या बदलाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी काहींनी अधिसूचना पालन करण्याकडे दुर्लक्ष केले तर काहींचे वाहतूक पोलिसांसोबत खटके उडाले.पर्यायी मार्गाला नापसंती मुंबईनाक्याकडून सीबीएस, शरणपूररोड अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी वाहनांना प्रवेश दिला जात होता; मात्र रविवार कारंजावर वाहतुकीचा ताण निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मुंबईनाका येथूनच थेट महामार्गाने वडाळानाक्यापर्यंत जाऊन द्वारका, आडगावनाका, काट्या मारुती चौकातून निमाणी या मार्गाचा अवलंब करावा, असे अधिसूचनेत म्हटले होते; मात्र वाहनचालकांनी या लांब पल्ल्याच्या पर्यायी मार्गाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. त्यामुळे मेहेर चौक, अशोकस्तंभ व रविवार कारंजा चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली.प्रयोगाचा आज दुसरा दिवस रविवारी (दि.२१) प्रसिद्ध करण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचा बुधवारी (दि. २४) दुसरा दिवस असणार आहे. पोलिसांकडून पुन्हा असा प्रयोग या मार्गावर नियोजित वेळेनुसार राबविला जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी आणि पर्यायी मार्गावरील वाहतूक वळविल्यामुळे अन्य रस्त्यांवर येणारा ताण शहर वाहतूक शाखेकडून विचारात घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
एकेरी वाहतुकीचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:27 AM