नाशिक- शहरात ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होत असताना दुसरीकडे मात्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी महापालिकेला निधी उभारणे कठीण होत आहे. काही खासगी सेवाभावी संस्थांनी यासंदर्भात आर्थिक मदतीची उभारणी केली असली तरी महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीकडे वर्ग केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वापराविना पडून आहे. हा निधी ऑक्सिजन प्रकल्पासाठी वापरावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या रूग्णालयात ऑक्सिजन बेड मिळत नाही. महापालिकेने ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्याची तयारी केली आहे. त्यासाठी नाशिक आयटी असोसिएशन, भारत विकास परिषद आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेने स्वयंस्फूर्तीने ४५ लाखाचा निधी उभारुन या निधीद्वारे महापालिकेसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे कार्य हाती घेतलेले आहे व अवघ्या आठवडाभरात हा प्रकल्प उभा रहाणार आहे; मात्र स्मार्ट सिटी कंपनीकडे कोट्यवधी रुपयांचा महापालिकेचा निधी वापराविना पडून आहे. त्याचा वापर करावा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे.
इन्फो...
इन्फो...
स्मार्ट सिटीपेतील प्रकल्पांना आज ऑक्सिजनची अधिक गरज आहे. त्यातच स्मार्ट सिटीचे काम अत्यंत संथ गतीने असून, काही कामे सुरूदेखील झालेली नाहीत. त्यामुळे ज्या प्रकल्पांची आज नाशिकला गरज नाही, अशा प्रकल्पांसाठी राखीव असलेली रक्कम जर या ऑक्सिजन प्लँटच्या निर्मितीसाठी वापरली तर त्याद्वारे शहरातील अनेक रुग्णालयांना व त्यामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना सध्या जाणवत असलेली ऑक्सिजनची कमतरता तत्काळ दूर होईल, असे अजय बोरस्ते यांनी निवेदनात म्हटले आहे.