नाशिक : आधुनिक काळातील बदलत्या तंत्रज्ञानाचा ग्राहकांच्या हितासाठी उपयोग करून बॅँकेने प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन श्यामराव विठ्ठल बॅँकेचे (एसव्हीसी) अध्यक्ष सुरेश हेमाडी यांनी केले. ‘बेस्ट चेअरमन’ अवॉर्डने नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले. यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी बोलताना हेमाडी म्हणाले, चांगली सेवा देऊन ग्राहकांना समाधान देणे याला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची सेवा करून त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्यासाठी बॅँक नेहमीच तत्पर आहे. ग्राहकांच्या प्रगतीतच बॅँकेची प्रगती असल्याचा अनुभव आम्हाला आला आहे. यामुळेच आज आमच्या बॅँकेचा कारभार नऊ राज्यांत पसरला आहे. बॅँकेच्या १५८ शाखा असून, १८,५०० करोड रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होत आहे. सहकार क्षेत्रात काम करताना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामकाज सुकर व्हावे. ग्राहकांना सहज सोप्या पद्धतीने सेवा मिळाव्यात यासाठी बॅँकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कार्पोरेट इंटरनेट बॅँकिंग, ई -केवायसी, आधारकार्डवर आधारित पेमेंट यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय विसा डेबिट कार्ड या बॅँकेने पुरविलेल्या आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण सेवा आहेत. बॅँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग स्वत:साठीच न करता अन्य ८० पेक्षा जास्त सहकारी बॅँक ांनाही अशा सुविधा पुरविल्या आहेत. आमची सहकारी क्षेत्रातील एकमेव बॅँक आहे जी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि तामिळनाडू या ९ राज्यांमध्ये पसरली आहे. पुढील आर्थिक वर्षात बॅँक २३ नव्या शाखा सुरू करणार आहे, तर हरियाणा या दहाव्या राज्यातही बॅँक आपला कारभार सुरू करणार आहे. आमच्याकडे ‘क्रेडिट मार्केटिंग’ नियोजनासाठी विशेष अधिकाऱ्यांची एक ‘टिम’ आहे. अतिरिक्त व्यवसाय संधी मिळविणे हे या टिमचे कार्य आहे. बॅँकेचे ग्राहक आणि क्षमता असूनही जे बॅँकेचे ग्राहक नाहीत त्यांना बॅँकेची सेवा देणे हे त्यांचे कार्य आहे. ही टिम बॅँकेच्या सर्व शाखांबरोबर समन्वय साधणार आहे. उद्योजकांच्या विविध प्रकारच्या गरजा हेरून व्यवसायाची व्यूहरचना आखण्याचीही जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे आहे. यामुळे भविष्यातही एसव्हीएस ही बॅँक प्रगतिपथावर राहणार आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
ग्राहकांच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग
By admin | Published: December 21, 2014 12:51 AM