ठळक मुद्देसाहेबांना’ दाखवून येतो, तुम्ही येथेच थांबा’ असे सांगून पोलीस ठाण्यात गेला; मात्र पुन्हा बाहेर परतला नाही‘वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना, तुमचा मोबाईल आवडला आहे
नाशिक : चोरी, फसवणूकीचे विविध फंडे चोरट्यांकडून वापरले जातात आणि ते समोरही येतात;मात्र नाशिकमध्ये म्हसरुळ परिसरात अत्यंत धाडसी फंडा एका मोबाईल चोरट्याने वापरला, तो म्हणजे चक्क म्हसरुळ पोलीस ठाणे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या नावाचा वापर करत मोबाईल घेऊन थेट पोलीस ठाण्यातूनच पलायन करण्याचा.
घडलेला प्रकार असा, ‘ओएलएक्स’वर मोबाईल विक्रीची जाहिरात एका नागरिकाने दिली होती. संबंधित नागरिकाशी मोबाईल चोरट्याने लघुसंदेशाद्वारे संपर्क साधत चॅटिंग केले आणि त्याचा विश्वास संपादन केला. ‘वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना, तुमचा मोबाईल आवडला आहे, आणि त्यांना तो खरेदी करावयाचा आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईल घेऊन पोलीस ठाण्यात या’ असा संवाद साधला. भेटीच्या ठरलेल्या वेळेनुसार संबंधित मोबाईल धारकाने म्हसरुळ पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधून ‘मी म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या परिसरात आलो आहे’, अशी कल्पना दिली. चोरट्याने त्यांच्या जवळ येऊन वरील संवादानुसार मोबाईल हातात घेतला आणि ‘साहेबांना’ दाखवून येतो, तुम्ही येथेच थांबा’ असे सांगून पोलीस ठाण्यात गेला; मात्र पुन्हा तो बाहेर परतलाच नाही. बराच वेळ झाल्यानंतरही साहेबांना मोबाईल दाखविणारा बाहेर येत नसल्याचे बघून मोबाईल मालकाने पोलीस ठाण्यात प्रवेश करुन थेट वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची भेट घेतली. ‘साहेब, ओएलएक्सवरील मोबाईल विक्रीची जाहिरात मी केली होती, तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे का’ असा प्रश्न केला, तेव्हा पोलीस निरिक्षकांनी ‘मला कुठलाही मोबाईल घ्यावयाचा नाही, माझ्याकडे मोबाईल आहे, त्यामुळे तुम्ही मला कसे विचारता‘ असे सांगितले. त्यावेळी संबंधित मोबाईल मालकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याने पोलीस निरिक्षकांच्या कॅबीनमध्येच बसून घेतले. यावेळी पोलीस निरिक्षकांनी संबंधितांना विश्वासात घेत हकीगत जाणून घेतली असता त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. याप्रकरणी वीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीचा प्रकार पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्याबाबत संबंधितांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास म्हसरुळ पोलीस करीत आहेत.