नाशिक : ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ संस्थेच्या वतीने येत्या १२ जानेवारी रोजी शहरात ‘वेणुनाद’ हा सामूहिक बासरीवादनाचा कार्यक्रम होणार असून, त्यात तब्बल चार हजारांहून अधिक बासरीवादक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू असून, त्यासाठी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून १,७०० बासऱ्या नाशिककडे रवाना झाल्या आहेत. भारतीय संस्कृती व वाद्यांच्या प्रसारासाठी हा भव्य कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमास आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर व पंडित हरिप्रसाद चौरसिया उपस्थित राहणार आहेत. प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात देशभरातील बासरीवादक सहभागी होणार असले, तरी बहुतांश कलावंत नाशिकमधील असणार आहेत. या पार्श्वभूमीवर पं. मुजुमदार यांनी नुकतेच नाशकात सराव शिबिर घेतले. याशिवाय शहरातील शाळा-महाविद्यालयांतही बासरीवादनाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमासाठी नाशकात एवढ्या मोठ्या प्रमाणात बासऱ्या उपलब्ध होणार नसल्याने त्या खास उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून मागवण्यात आल्या आहेत. पिलीभीत येथील बासऱ्या प्रसिद्ध आहेत.कार्यक्रमात बरेच नवोदित बासरीवादक सहभागी होणार असल्याने दोन विशिष्ट प्रकारच्या बासऱ्यांचे उत्पादन करून घेण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील बासरीवादक विश्वास बिवलकर व उत्पादक रमेश बकाले हे सध्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे मुक्कामी आहेत. (प्रतिनिधी)
‘वेणुनाद’साठी उत्तर प्रदेशातून बासऱ्याशहरात
By admin | Published: December 22, 2014 12:58 AM