त्र्यंबकेश्वर : येथे उत्तरा नक्षत्राचा मुसळधार पाऊस पडत असून, केवळ ४ ते ५ तासात २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ८९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. संततधार कायम आहे. त्र्यंबकचे कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी म्हणाले, या पावसाने काय होणार आहे अजून पावसाची गरज आहे तरच पिकांना जीवदान मिळू शकेल.दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार आगमन झाले. शुक्रवारीही पावसाचे सातत्य दिवसभर होते. पावसाच्या आगमनामुळे भगवान त्र्यंबकेश्वर दर्शनार्थींची मोठी गैरसोय झाली. भरपावसात भाविकांनी रांगा लावल्या होत्या. अक्षरश: चिंब झाले होते. अशाही अवस्थेत दर्शन घेण्यासाठी आठ आठ तास लागत होती.दरम्यान, शहरासह तालुक्यातदेखील दमदार पाऊस आहे. तथापि अन्य ठिकाणच्या तुलनेत हरसूल परिसरात पाऊस असला तरी म्हणावा असा जोर नसल्याचे हरसूल येथील पावसाबाबत प्रतिक्रिया घेतली असता, भाताला जीवदान मिळाले असले तरी २५ ते ३० टक्के नुकसान करपा वगैरे रोगाने यापूर्वी झाले आहे. मात्र भुईमूग, कडधान्य या पिकांना अगदी वेळेवर पाऊस मिळाल्याने ही पिके चांगली येतील.जोरदार पाऊस असूनही बडा उदासीन अखाड्याच्यापुढे दर्शनार्थींची रांग पोहचली आहे. आज दुपारनंतर व उद्या गर्दीत निश्चित वाढ होईल. कारण नाशिकची पर्वणी संपल्यानंतर भाविकांना लोंढा त्र्यंबकेश्वरकडे वाहत असतो. त्र्यंबकला आज दुपारच्या सुमारास मुसळधार पावसात डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची मिरवणूक निघाली होती. महाराजांना एका पालखीत बसवून पालखी भक्तजनांनी खांद्यावर घेतली होती. स्वत: महाराज व त्यांचे शेकडो भक्त पावसाने भिजून चिंब झाले होते. अशाही अवस्थेत भक्त नाचण्यात तल्लीन झाले होते.विशेष म्हणजे हे महाराज जंगम समाजाचे होते व त्यांचे सर्व भक्त जंगम समाजाचे होते. संपूर्ण तालुक्यात पाऊस जोरदार पडला म्हणून समाधान मानले जात आहे. (वार्ताहर)
त्र्यंबकला उत्तरा नक्षत्र जोरदार बरसले
By admin | Published: September 18, 2015 10:28 PM