भारतातील महत्वाचे प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या सांस्कृतिक जडणघडणीमुळे या दोन क्षेत्रात नाशिकने वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही नाशिकच्या अतुच्च कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रातही नाशिकचे नांव अभिमानाने घेतले जाते. नाशिकची क्रीडा क्षेत्रातही वेगळी ओळख दिसून येत आहे. कारण मुंबई - पुण्याच्या खेळाडूंना जमले नाही अशी कामगिरी नाशिकच्या खेळाडूंनी ऍथलेटिक्स, क्रिकेट. बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, स्विमिग, बुद्धीबळ, तलवारबाजी अश्या विविध खेळात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. नाशिकच्या क्रीडा क्षेत्राच्या या जडणघडणीत आणि प्रगतीमध्ये काही क्रीडा धुरीणींनी अथक परीश्रम घेतल्यामुळेच ही वेगळी ओळख दिसून येत आहे. नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला ही मजल गाठण्यात व्ही. व्ही. उर्फ विनायक विश्वनाथ सूर्यवंशी सर यांची सर्वात महत्वाची भूमिका आहे.सूर्यवंशी सर खेळाचे भीष्माचार्यच होते यात काही शंकाच नाही.
सरांचा जन्म १९ जून १९३६ला कराची, ( आत्ताचे पाकिस्थान) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या हरीबाई देवकीदास शाळा आणि पुण्याच्या एन. एम, व्ही. शाळेत झाले. त्यांनी बी. एससी. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये केले.तर खेळातील बी. पी. एड. आणि एम एड. मुंबईच्या कंदावली येथे पूर्ण केले. त्याचबरोबर सरांनी उर्दू भाषेचा डिप्लोमा डीस्टिंगशन मध्ये ९२% मार्क मिळवून पूर्ण केला. सरांचे खेळात प्रावीण्य असल्यामुळे त्यांनी सन १९६२ला पंजांबच्या पतियाळा येथे ऍथलेटिक्समधील " ए " ग्रेडची प्रशिक्षक आणि ऑफीशियलची परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या क्रीडा कौशल्याची प्रचीती दिली. त्यानंतर सरानी १९६४ ते १९६६ ही दोन वर्षे मुंबईच्या दादर येथील शिवाजीपार्कच्या समर्थ व्यायामशाळा येथे प्राचार्य म्हणून कांम केले त्यानंतर अमरावतीच्या हनुमान व्यायामशाळा येथे एक वर्षे प्राचार्य म्हणून काम केले.नाशिकची कारकीर्द :- १९६६ पासून सरांची खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये कारकीर्द सुरु झाली ती त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच होती. सरानी १९६६ला नाशिकच्या बॉईज टाउन संस्थेत आपल्या कार्याला सुरवात केली. तेथे त्यांनी खेळाचे धडे तर दिलेच शिवाय त्यांनी मुलांना सायन्स आणि मॅथ्सही शिकवले. सरांवर या संस्थेची संपूर्ण जबाबदारी असल्यामुळे सरानी खेळ आणि शिक्षणाबरोबर ट्रेकींग, माउंटनींग, मड बाथ, दही हंडी , होळी , सिव्हिल डिफेन्स , ट्रेजर हंट असे सर्व उपक्रम राबवले. सरांच्या कारकिर्दीत बॉईज टाउनच्या खेळाडूंनी चांगली प्रगती केली. सरानी तयार केलेल्या फुटबॉलच्या संघाने १९७१ला राज्य स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर क्रिकेटमध्ये जिल्हात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर सर १९७४ला गोखले एजुकेशन सोसायटीच्या एच . पी . टी / आर . वाय . के कॉलेजमध्ये शाररीक शिक्षण सचालक म्हणून रुजू झाले. त्यांनी काही दिवस एस . एम . आर . के कॉलेजमध्येही काम बघीतले . येथेही सरानी अनेक दर्जदार खेळाडू घडवले. परंतु सरानी आपले काम केवळ कॉलेजपुरते मर्यादित न ठेवता सरानी ऍथलेटिक्स , बास्केटबॉल, फुटबॉल क्रिकेट खेळाच्या प्रगतीसाठी आपले काम सुरूच ठेवले . सरानी दिल्ली येथे सन १९८२ साली झालेल्या एशियाड (आशियायी ) स्पर्धेमध्ये प्रमुख पंच म्हणून कामगिरी पार पडली . या एशियाडसाठी महाराष्ट्रातून केवळ चार व्यक्तींची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकमधून आणि पुणे विद्यापीठातून सरांची एकमव निवड झाली होती ही विशेष . नाशिकच्या क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीत सरांची मोलाची भूमिका राहिलेली आहे. सरानी आपल्या प्रशिक्षणातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले , यामध्ये ऍथलेटिकस मधील माधवी (राणी ) बोकील, चंदू निपुंगे, शेखर शिंदे, हेमंत पांडे, दिलीप लोंढे , वर्षा परोळसांडे पासून ते आत्ताच्या कविता राऊत, मोनिका आथरे , संजिवनी जाधव अश्या अनेक खेळाडूंना सरानी मार्गदर्शन केले. तर क्रिकेटमध्ये सरानी रोहिंग्टन इराणपूर, आर . टी . इराणी, रोहित दलाल, कॉल बुहारीवाला , पी . पी. पालिया, अल्लाहाबादी, नजमा तांबावाला, नेव्हिल दिवेंच्या, केरसी मावद्रोहीना , मिलिंद चौधरी, भिकू कत्रिक, जुगल ठाकूर, जिमी अरिफ, शमीम शेख, सर्वेश सफारी, कोकाटे, ओबेरॉय, लेनिनवाला, होसी कपाडिया , छोटा कुरेशी असे खेळाडू तसेच एच . पी. टी./आर. वाय. के. कॉलेजच्या माध्यमातून कुमार केतकर, हेमंत पै आंगले , सुनील काळे, राजेंद्र लेले, शिराज हुद्दा, अविनाश भिडे, मकरंद ओक, राजेंद्र केदार, किरण जोशी असे तर बास्केटबॉलमध्ये किशोर कुलकर्णी, संजय मालुसरे असे अनेक दर्जदार खेळाडू घडवले.नाशिकच्या संस्था / संघटनांमध्ये कार्य :- नाशिकच्या क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीमध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये नाशिकच्या जुन्या क्रीडा संस्था यशवंत व्यायाम शाळा, नाशिक जिमखाना, मित्र विहार तसेच नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन, नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन नाशिक जिल्हा स्वीमिंग असोसिएशन, नाशिक पोलीस ग्राउंड, पी. टी. सी. ( महाराष्ट्र पोलीस अकॅडमी) यांच्या सर्व संस्थांच्या जडणघडणीत आणि प्रगतीमध्ये सरांचा मोलाचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सरांकडे सर्व खेळांचे तांत्रिक ज्ञान होते. खेळात सर्वात अवघड असलेल्या धावण्याच्या ट्रॅकची आखणी करण्यात सरांचा हातखंडा होता. या ट्रॅक आखाणीसाठी त्सरांना अनके ठिकाणी बोलावणे आले परंतु सरांनी कंटाळा न करता सर्व ठिकाणी जाऊन ट्रॅकची आखणी करून सर्वांनाच सहकार्य केले. सरांच्या मनात सतत खेळाचा आणि खेळाचाच विचार सुरु असायचा. त्यांच्या शेवटच्या घटकेपर्यंत सर आपल्या घरच्यांशी बोलतांनाही खेळाच्याच गप्पा करत होते. हा खेळाडू कसा आहे. त्या खेळाडूचे काय चालले आहे असेच त्यांचे सतत विचारणे होते.घरच्यांची मोलाची साथ :- सरांच्या क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीत घरच्यांचेही सरांना संपूर्ण सहकार्य मिळाले आहे. सरांच्या अर्धांगीनी सुलभाताईंनी सरांना कामयच त्यांच्या खेळाच्या उपक्रमांना मोलाचे सहकार्य केले. सुलभाताईंनी सांगितले की मला सरासोबत एक परिपूर्ण आयुष्य जगता आले तसेच सरांच्या कामामुळे त्यांचा विद्यार्थ्यांमध्ये असलेला आदर याचाच आम्हाला अभिमान वाटतो असे सांगितले. सरांचे दोनही मुले विक्रम आणि विशाल हे दोघेही दर्जदार क्रिकेट खेळाडू होते. परंतु सरांचा क्रीडा क्षेत्रात इतका वावर असूनही सरांनी आपल्या मुलांकरिता कोणाकडेही शिफारस केली नाही. खेळाडूने मेहनत करूनच पुढे जावे मग तो स्वतःचा मुलगा असला तरीही सरांनी कायमच ही भूमिका घेतली, ☺️तर सरांची मुलगी सौ. वैशाली आणि जावई दीपक भोसले यांनीही सरांच्या क्रीडा उपक्रमासाठी नेहमीच चालना दिली. या सर्वांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच सराना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत खेळाचाच ध्यास धरणे शक्य झाले. क्रीडा क्षेत्रात मोठी भरीव कामगिरी असूनही सरांनी स्वतःला प्रसिद्धी पासून दूर ठेवले.विविध पुरस्कार :- सरांचे कार्य इतके मोठे होते कि त्याना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार, नाशिक जिल्हा ऑलीम्पिकचा पुरस्कार, महाराष्ट्र पोलीसकडून पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय पुरस्कार, चौधरी यात्रा पुरस्कार, कै. व्ही. पी.बागुल पुरस्कार, बिटको कॉलेज पुरस्कार, जिल्हाधिकरी अशोक बसाक यांच्याकडून पुरस्कार, असे अनके पुरस्कार देऊन सरांना सन्मानित करण्यात आले. ही योग्यच आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करावा हेचसरांच्या सर्व चाहत्यांना अपेक्षित होते.सरांच्या जाण्याने नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची अपरिमित हाणी झाली आहे. त्यामुळे सरांनी घडविलेल्या क्रीडा कार्यकर्त्यांनी सरानी जसे कार्य केले ते कार्य तसेच पुढे नेण्यासाठी काम करावे हीच खरी सरांना मोलाची श्रद्धांजली ठरणार आहे.- संकलन, आनंद खरेक्रीडा संघटक, क्रीडा समीक्षक