पाथर्डी फाटा : नाशिक, कसारा व घोटी मार्गावरील खासगी प्रवासी वाहतूक करणाºया टॅक्सीधारकांमध्ये प्रवासी घेण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादामुळे गाड्यांमधून प्रवासी उतरवून दिल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे रद्द झाल्याने खासगी वाहनांचा आसरा घेणाºया प्रवाशांना या प्रकारामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.आधीच मुंबईचा पाऊस आणि रेल्वे अपघातामुळे गाड्या रद्द झाल्याने मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून द्वारका येथे प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे; मात्र द्वारका येथे गाडी भरण्याच्या व्यावसायिक स्पर्धेत शहरातील आणि घोटी येथील वाहनधारक यांच्यात वाद होऊन प्रकरण हातघाईवर गेले. या घटनेनंतर घोटी पट्ट्यावरील सर्व शहराबाहेरचे वाहनचालक गरवारे पॉइंटवर एकत्र आले व त्यांनी द्वारका, लेखानगर व पाथर्डी फाटा येथून प्रवासी घेऊन कसारा, घोटीकडे जाणारी वाहने अडवून प्रवासी उतरवून दिले. या प्रकारामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने आहेत तिथेच उभी केल्याने प्रवाशांना कसारा व घोटीकडे जाण्यासाठी तासन्तास भर पावसात ताटकळत उभे राहावे लागले. नाशिकमधील वाहनचालक घोटीतील म्हणजेच ग्रामीण भागातील वाहनचालकांना वाहने भरू न देता प्रवासी घेण्यास विरोध करीत असल्याचे घोटी येथील चालकांचे म्हणणे आहे. याला विरोध म्हणून या चालकांनी शहराबाहेर ग्रामीण हद्दीत या वाहनांना मज्जाव केल्याने गरवारे परिसरात या गाड्या अडवून प्रवाशांना उतरूवून देण्यात आले. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चालकांच्या आपापसातील या वादामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप होऊन त्रास सहन करावा लागला.
प्रवासी घेण्यावरून टॅक्सीचालकांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:41 AM