सिन्नर : येथील पंचायत समितीची गेल्या महिन्यात तहकूब करण्यात आलेली मासिक आढावा बैठक शनिवारी पाच मिनिटांत सर्व सात विषयांना मंजुरी देत उरकण्यात आली. त्यानंतर विरोधी भाजपाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी एकाधिकारशाही करून दुष्काळासारख्या गांभीर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजपाचे विजय गडाख, रवींद्र पगार व तातू जगताप यांनी केला.११ आॅक्टोबर रोजी पंचायत समितीची मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी नसल्याने सदर बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर सदर तहकूब बैठक शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. दुपारी एक वाजता भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार व तातू जगताप सभागृहात हजर झाले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे सदस्य सभागृहात आले. बैठक सुरू झाल्यानंतर गडाख व पगार यांनी बैठक उशिरा का सुरू करतात याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर मूळ इतिवृत्ताची मागणी केली. त्यावर कातकाडे यांनी सभेपूर्वीच सर्व सदस्यांना इतिवृत्ताची झेरॉॅक्स व अजेंडा पाठविण्यात आल्याचे सांगितले. उपस्थित सदस्यांनी इतिवृत्तात स्वाक्षरी करावी, अशी मागणी त्यांनी केली; मात्र पगार यांनी आम्हाला मूळ इतिवृत्त दाखविले जात नसल्याने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने त्यावरून भाजपा व सेना सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्याची मागणी कातकाडे यांनी केली. त्यास सेनेच्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिल्याने सर्व विषय पाच मिनिटात मंजूर झाले. सभापती पथवे यांनी सभा संपल्याचे सांगितले व राष्टÑगीत घेण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा उपयोग करून सभा पाच मिनिटांत संपविल्याने भाजपाच्या सदस्यांनी गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. गटनेते गडाख यांनी याबाबत दूरध्वनीहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली.दरम्यान, गडाख, पगार व जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाºयांवर एकाधिकारशाहीचा आरोप केला. तालुका दुष्काळी जाहीर झाल्यामुळे त्यावर चर्चा करून टॅँकर नियोजन, चाराटंचाईवर उपाययोजना यावर चर्चा करणे अपेक्षित होते; मात्र सत्ताधाºयांनी पाच मिनिटांत सभा उरकल्याने भाजपा सदस्यांनी संताप व्यक्त केला. पूर्व भागात दुष्काळाची दाहकता असताना सत्ताधारी या परिसरावर अन्याय करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दुष्काळ व महत्त्वाच्या विषयांवर आम्हाला चर्चा करायची होती; मात्र विरोधकांनी बैठकीला दहा मिनिटे उशीर झाल्याचा कांगावा केला.
सर्वांना सभेपूर्वीच गेल्या सभेचा इतिवृत्त घरपोहोच केला होता; मात्र विरोधकांना जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी त्यांनी आकांडतांडव करण्यास प्रारंभ केला. आमच्याकडून चूक होत असेल तर बैठकीत मांडण्याचे सोडून विरोधक बिनकामाच्या विषयावर चर्चा करू लागले. इतिवृत्तावर स्वाक्षºया करण्यास नकार दिला. सही नसेल तर चर्चेत भाग घेताच कसा येईल? दडपशाही करण्याचा प्रश्नच येत नाही. लोकशाहीनुसार कामकाज केले जाते. विरोधकांचे आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत. - संग्राम कातकाडे, गटनेता, शिवसेना.