नाशिक : प्रचारासाठी जिवाचे रान करणाऱ्या उमेदवारांना कुठेही मतदारांचा फारसा उत्साह दिसत नसल्याने ते आधीच चिंतित आहेत. त्यात २० आॅक्टोबरच्या रविवारपासूनच मुलांच्या शालेय सुट्ट्यांना प्रारंभ होत असल्याने आपला मतदार फिरायला बाहेरगावी जाऊ नये, अशी धास्ती उमेदवारांना वाटत आहे.सध्या बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे सर्वच पालक विद्यार्थ्यांच्या परीक्षा, त्यांची वेळापत्रके आणि अभ्यास घेण्यात गर्क आहेत. मात्र, त्यातील बहुतांश शाळांच्या परीक्षा या आठवड्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहेत. सोमवारी अर्थात २१ तारखेला मतदान असल्याने त्या दिवशी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा आदला दिवस रविवार असल्याने त्या दिवशी तर हक्काची सुटी राहणार आहे. त्यामुळे त्या रविवारला लागून कुणी दोन दिवस, तर कुणी चार दिवसांची सुटी टाकली तर आपल्याला मतदान कमी होईल, अशी शक्यतादेखील उमेदवारांना त्रस्त करीत आहे. त्यामुळेच आपला हक्काचा मतदार कोणत्या गावाला तर निघून जाणार नाही ना, अशीच धास्ती उमेदवारांना पडली आहे. अर्थात जागरूक मतदार तसेच विशिष्ट विचारधारेशी बांधिलकी मानणारा मतदार तर मतदान केल्याशिवाय बाहेर कुठेच जात नाही. मात्र, मतदानाबाबत फारसा उत्सुक नसणारा मतदार या रविवार, सोमवारच्या सुटीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने बाहेर निघून गेला तर मतदानाचा टक्कादेखील घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमेदवारांना सुट्ट्यांचा धसका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:02 PM