नाशिक : जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसींचे नियोजन करीत जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नााशिक जिल्ह्याने शुक्रवारी एकाच दिवशी ४४ हजार ७१२ नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केला. गेल्या सहा महिन्यात हे सर्वाधिक लसीकरण असून, त्यामुळे लसीकरणाच्या कार्याला गती मिळाली आहे.
जिल्ह्याला मागणीनुसार प्राप्त होणाऱ्या लसींच्या आधारे पंधरा तालुके आणि दोन महापालिका क्षेत्रात लसींचे वितरण जिल्हा प्रशासनाकडून केले जाते. त्यानुसार गेल्या आठवडाभरात जास्तीत लस प्राप्त होत असल्याने लसीकरणाची संख्यादेखील वाढत आहे. गुरुवारी (दि.२९) ८० हजार कोव्हिशिल्ड, तर २३ हजार कोव्हॅक्सिन लसींचा साठा जिल्ह्यासाठी मिळाला होता. मागील सहा महिन्यांत लसींचा एका दिवसात मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा स्टाॅक होता. या लसींच्या आधारे शुक्रवारी एकाच दिवसात ४४ हजार ७१२ नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम झाला.
जिल्ह्यात गेल्या १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने मिळणारी लस तसेच वाढत जाणारी लसीकरण केंद्रांची संख्या यांची सांगड घालत जिल्ह्यात लसींचे वितरण केले जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याने पहिला आणि दुसरा डोस देण्याचे नियोजन केले जात आहे. कोरोनापासून तूर्तास काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची सुखद वार्ता असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे लसीकरणाचा वेग वाढविला जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ८१ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. त्यात १४ लाख ५ हजार ४७७ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ही ४ लाख ७५ हजार इतकी आहे. लस तुटवड्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस शहर व जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे. गुरुवारी तब्बल १ लाख ३ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध झाल्याने दु्सऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमही झाला.