कोविड लसीसाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन ॲपमध्ये अजूनही अडचणी येत असल्याने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज ठाकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुशीलकुमार शिंदे व कोविड लसीचे तालुकाप्रमुख डॉ.पुनीत डोनर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांची नावे रजिस्टरला नोंदवून घेत त्यांचे लसीकरण केले. लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, नागरिक स्वत:हून लस घेत आहेत, तर बुधवार (दि.३)पासून चांदवड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळीभोई, वडनेरभैरव, उसवाड, काजीसांगवी, तळेगावरोही येथेही लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पेन्शन कागदपत्रे आदींपैकी एक कागदपत्र आणावे, असे आवाहन डॉ.पंकज ठाकरे यांनी केले आहे.
---------------------------------------------------------------
चांदवड बाजार आवारात एकाचा मृत्यू
चांदवड : चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (दि. ५) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गणपत गोरख घोलप (६१) हा इसम जेवण करीत असताना अचानक बेशुद्ध पडून खाली कोसळला. त्यास हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावल्याची खबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी योगेश शिवाजी शिंदे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. त्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत म्हणून घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस नाईक बिन्नर करीत आहेत.