नाशिक : गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा रुग्णालयाने नऊ नगरपालिका हद्दीतील ९१ टक्के बालकांचे लसीकरण केले आहे़ जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, येवला, सिन्नर, भगूर, देवळाली, मनमाड, नांदगाव, इगतपुरी आणि सटाणा या नगरपालिकांमध्ये जिल्हा रुग्णालयातर्फे लसीकरण मोहीम सुरू असून, ४ डिसेंबरपर्यंत ५५ हजार ४११ बालकांपैकी ५० हजार ५९४ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे़
विशेषत: लहान मुलांना होणाऱ्या गोवर व रूबेला या आजाराने देशात दरवर्षी सुमारे ५० हजार बालकांचा मृत्यू तर ४० हजार बालकांना व्यंगत्व येते. २०२० पर्यंत या दोन्ही आजारांना नियंत्रित करण्यासाठी सरकारतर्फे गोवर-रूबेला लसीकरण मोहीम सुरू आहे़ त्यानुसार ९ महिने ते १५ वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांचे लसीकरण केले जात आहे़ शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या बालकांचे लसीकरण केले जात असून, गत नऊ दिवसांत ९१ टक्के बालकांचे लसीकरण केले आहे़ तर येत्या चार आठवड्यात उर्वरित बालकांचेही लसीकरण केले जाणार आहे़