नाशिक : बहुप्रतीक्षित कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस शनिवारी (दि. १६) जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रांवर होणाऱ्या या लसीकरण मोहिमेत पहिल्यादिवशी १३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिला जाणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोस् प्राप्त झाले असून, ३५ हजार ८२९ आरोग्य कर्मचाऱ्यांना या मोहिमेत लस टोचली जाणार आहे.
जिल्ह्यातील या सर्वात मेाठ्या लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून, लस सुरक्षिततेसाठीची यंत्रणादेखील सक्षम असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच मिळणार असून, पुढील टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचविली जाणार आहे. लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यासाठीचा पहिलाच प्रयोग असल्याने लसीकरणदरम्यान कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये तसेच मोहिमेची योग्य निरीक्षणे नोंदविण्यासाठी केंद्रे मर्यादित ठेवण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवरील तयारीदेखील पूर्ण करण्यात आली असून, या केंद्रांचा आढावा घेण्यात आला असल्याचे मांढरे यांनी सांगितले.
तीन टप्प्यात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. निवड करण्यात आलेल्या संस्थांसाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक संस्थानिहाय पाच अधिकारी व कर्मचारी यांचे पथक बनविण्यात आले असून, या टीमने लसीकरणादरम्यान मास्क व ग्लोव्हजचा वापर करणे अनिवार्य आहे. कोविड-१९ लसीकरणासाठी प्रत्येक ठिकाणी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली असून, पहिल्या वेटिंग रूममध्ये लाभार्थीला ६ फुटांचे सामाजिक अंतराचे भान पाळून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लस टोचल्यानंतर अर्धा तास कर्मचारी देखरेखीखाली राहणार आहे. रुग्णाला कोणताही त्रास झाल्यास डाक्टर्स तसेच ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहे.
--इन्फो--
जिल्ह्यातील १६ लसीकरण केंद्रे
१) जिल्हा रुग्णालय, नाशिक २) सामान्य रुग्णालय, मालेगाव ३) उपजिल्हा रुग्णालय, कळवण ४) उपजिल्हा रुग्णालय, निफाड ५) उपजिल्हा रुग्णालय, चांदवड ६) उपजिल्हा रुग्णालय, येवला ७) इंदिरा गांधी हॉस्पिटल, नाशिक ८) शहरी आरोग्य केंद्र, नवीन बिटको हॉस्पिटल ९) आरोग्य केंद्र जे. डी. सी बिटको १०) शहरी आरोग्य केंद्र, कॅम्प वॉर्ड मालेगाव ११) शहरी आरोग्य केंद्र निमा १ मालेगाव १२) शहरी आरोग्य केंद्र, रमजानपुरा, मालेगाव १३) शहरी आरोग्य केंद्र, सोयगाव केंद्र, मालेगाव.
--इन्फो--
असे होईल लसीकरण
लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचे यावेळी तापमान आणि सॅनिटाझेशन केले जाईल. दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये लाभार्थीची ओळखपत्रानुसार कोविन ॲप या ॲप्लिकेशनमध्ये नोंद करण्यात येऊन त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या निरीक्षण रूममध्ये लाभार्थीला ३० मिनिटे परीक्षणासाठी बसविण्यात येणार आहे. नोंदणीकृत आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना मोबाईलवर लस केंद्र आणि वेळ पाठविली जाणार आहे.
---इन्फो---
आरोग्य कर्मचारी वर्गीकरण
जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या फेरीत एकूण १९ हजार ५४८ आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात लस साठविण्यासाठी २१० आयएलआर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.