येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या मागणीनंतर, सरपंच योगेश घोटेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या यांच्यामार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव यांच्याकडे मागणी केल्याने आरोग्य विभागानेही गावात आरोग्य उपकेंद्र स्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी देत ते प्रत्यक्षात सुरूही केले. वडांगळी गावात सतीमाता सामतदादा देवस्थानमुळे भाविकांची नेहमी वर्दळ असते. गावातील व्यापारी वर्गातही अनेकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे.
ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, व्यापारीवर्ग, शेतमाल अथवा इतर वस्तू ने-आण करणारे वाहन चालक व मालक, कंपनीमध्ये जाणारे कामगार यांना वरील क्रमाने लस देणे आवश्यक आहे. अशा आशयाचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांची जिल्हा परिषदेत गेल्या आठवड्यात सरपंच घोटेकर यांनी भेट घेत दिले होते. त्यावर उपकेंद्रांवर लसीकरण केंद्र सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन बच्छाव यांना वडांगळी व पंचाळे या दोन गावांचे प्रस्ताव मागवून घेतले होते. वडांगळी येथे झालेल्या लसीकरणात १५२ ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली. उपकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोना निबंध मोडीत निघू शकतात, म्हणून सरपंच घोटेकर यांनी जिल्हा परिषद शाळेत निरीक्षण कक्ष, लसीकरण कक्ष व नोंदणी कक्ष असे तीन वर्ग खोल्या उपलब्ध करून, सामाजिक अंतर पाळून लसीकरण करून घेतले. या कामात विलास खुळे, विक्रम खुळे, नानासाहेब खुळे, अमोल अढांगळे, रवी माळी, रमेश क्षत्रिय, भाऊसाहेब खुळे, अमित भावसार, रमेश खुळे, सचिन कुलथे आदींचे सहकार्य लाभले.