नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या अभियानालाही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १२२ शासकीय लसीकरण केंद्रांवर नागरिकांना मोफत लस दिली जात असून, खासगी रुग्णालयाच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या लसीकरणाने आतापर्यंत दीड लाखांचा टप्पा ओलांडला असून, एक लाख ५५ हजार ३७६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोना लसीकरणाला देशभरात १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस देण्यात येत होती. मात्र, १ मार्चपासून सामान्य नागरिकांमधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षावरील कोमॉर्बिड रुग्णांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभीच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकही काहीसे बिचकतच लस घ्यायला येत होते. मात्र, आठवडाभरातच लस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होऊ लागली. तसेच आरोग्य विभागानेही जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्येही लसीकरणाला प्रारंभ केला. त्यामुळेच कोरोना लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. आता लवकरच आणखी एका टप्प्यातील नागरिकांचा त्यामध्ये समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अन्य नागरिकांनाही कोरोना लस लवकरच उपलब्ध होऊ शकणार आहे.
इन्फो
अर्धा तास देखरेखीमुळे वेग कमी
प्रत्येक लसीकरणानंतर संबंधित रुग्णाला किमान अर्धा तास त्या रुग्णालयाच्या प्रतीक्षा कक्षात थांबविण्याचे आदेश आहेत. या काळात संबंधिताला कोणताही त्रास झाल्यास त्वरित उपचार करता यावेत, यासाठी दक्षता बाळगावी लागत आहे. मात्र, त्यामुळे लस देण्याचे काम अवघ्या मिनिटभरात झाले तरी प्रतीक्षा केंद्रात गर्दी होऊ नये, म्हणून फार वेगाने लसीकरण करणे योग्यदेखील ठरणार नसल्यामुळेच एकूणच लसीकरणाचा वेग काहीसा कमी आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक खासगी दवाखान्यांचा अंतर्भाव लसीकरण प्रक्रियेत होण्याची शक्यता आहे.