शहरी भागात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता वाडी-वस्तीपर्यंत आपले हात-पाय पसरवण्यास सुरुवात केली असून, ग्रामीण भागात अजूनही बहुतांश नागरिक लक्षणे दिसून येत असली तरीही केवळ भीतीपोटी तपासण्या करून घेत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. शासकीय आरोग्य सुविधा जनतेसाठीच असल्याने सध्याच्या परिस्थितीत कोणतेही दुखणे अंगावर न काढता तत्काळ वैद्यकीय उपचार व सल्ला घेण्याची गरज असून, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांनी समाजमाध्यमांतून ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्याची ही वेळ आहे. कोरोना तपासणी व लसीकरणसंदर्भात सामान्य जनतेत अनेक शंका-कुशंका असल्याने प्रशासन व सूज्ञ लोकांकडून शंकांचे निरसन करून जनजागृती करावी, असेही कळवण्यात आले आहे.
शासकीय आरोग्य यंत्रणेत कोणत्याही प्रकारचे चुकीचे अहवाल दिले जात नसून, लसही सुरक्षित असल्याने पेठ तालुक्यातील नागरिकांनी लक्षणे दिसून आल्यास तत्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी. समाजमाध्यमातून अफवा किंवा भितिदायक संदेशाऐवजी जनजागृती व्हावी.
- डॉ. योगेश मोरे , तालुका वैद्यकिय अधिकारी पेठ