नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोंदे दुमाला येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी बुधवारी सकळापासूनच नागरिकांची झुंबड उडाल्यानंतर सरपंचांनी पोलिसांची मदत घेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.गोंदे दुमाला येथे १८ वर्षांवरील नागरिकांना, तसेच पहिला डोस घेऊन ८४ दिवस संपून दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येणार असल्याचे चार ते पाच दिवसांपूर्वी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर सकाळी ९ वाजेपासून नागरिकांनी गर्दी केली होती.
आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु नागरिकांची तासातासाला गर्दी वाढतच होती. यामुळे या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना समजावत शांत केले. येथे उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचेदेखील नागरिक ऐकत नसल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. या पार्श्वभूमीवर सरपंच शरद सोनवणे यांनी गर्दी हटवण्यासाठी वाडी वऱ्हे पोलिसांची मदत घेतली.
पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व नागरिकांना बाहेर काढत एकाच रांगेत उभे राहून नंबर आल्यानंतर लस घेण्यास सांगितले. तेव्हा कुठे गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.याप्रसंगी राजू जाधव, डॉ. गवई, वाघ, सपकाळ, राऊन, आरोग्यसेविका मेदडे, मनीष जंजाड, राजाराम भोईर, दीपक सैंदाणे, रूपेश पहाडी, तसेच सर्व स्थानिक आशासेविका, आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.