कोरोनामुळे तणाव असलेल्यांसाठी समुपदेशन
नाशिक : कोरोनामुळे तणावात असलेल्यांसाठी महिला व बालकल्याण विभाग व मुंबई प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे दु:खद प्रसंग ओढवलेल्यांना मानसिक आधार देण्यासाठी १८००-१०२-४०४० अशी हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
डॉक्टर्स डे निमित्ताने कृतज्ञता
नाशिक : कोरोनाच्या काळात अनेकांना बरे करणाऱ्या डॉक्टरांविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉक्टर्स डे चे औचित्य साधून सामाजिक संस्थांच्यावतीने डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. काही सामाजिक संस्थांनी डॉक्टरांकडे प्रत्यक्ष जात त्यांना स्मृतिचिन्हे देऊन त्यांचा सन्मान केला.
युगांतर सोशल फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण
नाशिक : काेरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या आप्तेष्टांच्या आठवणीसाठी वृक्षारोपण करण्याचा अनोखा उपक्रम उपनगर येथील युगांत सोशल फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे.
लसीकरण केंद्रांची मागणी वाढली
नाशिक : लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत असल्याने सर्वच केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे प्रभागांमध्ये देखील लसीकरण केंद्रे सुरू करण्यात यावीत अशी मागणी आता नगरसेवकांकडून होऊ लागली आहे. यामुळे लसीकरणाला वेग येणार असून नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण येणार असल्याने केंद्रे वाढविण्याची मागणी केली जात आहे.
खरीप पीकविम्यासाठी मुदतवाढ
नाशिक : खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत असल्याने अखेर या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा योजनेचे आवाहन
नाशिक : पर्यावरण विभागाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील योजनेला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात या मोहिमेला अधिक गती देण्यात येणार असल्याने शासकीय कार्यालयांनी या मोहिमेत अधिकाधिक वृक्षारोपण करण्यात यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गणेशमूर्ती कारागिरांचा हिरमोड
नाशिक : शासनाने गणेशमूर्तीबाबत नव्याने निर्बंध आणल्यामुळे मूर्ती कारागिरांमध्ये नाराजी असल्याचे दिसते. शहरात अजूनही अपेक्षितपणे मूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले नसल्याचे दिसते. याशिवाय बाहेरगावाहून येणारी मागणी देखील कमी झाल्याने कारागिरांच्या कामकाजावर परिणाम झाला असल्याचे कारागिरांना मागणीची प्रतीक्षा आहे.