नाशिक : जिल्ह्यात गत दोन दिवसापासून लसींचा साठा अत्यल्प असल्याने, तब्बल ५२ लसीकरण केंद्रांवरील लसीकरण ठप्प झाले होते. नाशिक शहरातील २९ केंद्रांपैकी कोणत्याच केंद्रावर लसीचा पुरवठा झालेला नसल्याने सकाळच्या वेळी लसीकरण ठप्प झाले होते. मात्र, दुपारपर्यंत काही केंद्रांवर लस पोहोचल्यानंतर लसीकरण करण्यास पुन्हा प्रारंभ झाला.
जिल्ह्यात सोमवारी लसीचा साठा काही मोजक्याच केंद्रांवर उपलब्ध होता. त्यामुळे लसीकरणासाठी रविवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. दरम्यान, सोमवारी जिल्ह्याला ७८ हजार लसीचा साठा प्राप्त झाला असला तरी, सकाळी तो सर्व केंद्रांवर पोहोचू शकला नव्हता. दुपारनंतर काही केंद्रांवरच लस पोहोचल्याने केवळ तिथेच लसीकरण करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याला सोमवारी सकाळी ७५ हजार कोविशिल्ड, तर तीन हजार कोव्हॅक्सिन असा ७८ हजार लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या आठवड्यापासून बहुतांश नवीन डोस घेणाऱ्यांना कोविशिल्ड उपलब्ध झाले आहे, तर दुसरा डोस ज्यांचा असेल त्यांना पहिली लस ज्या कंपनीची दिलेली असेल तीच लस दुसऱ्यावेळी देण्यात येणार आहे. या परिस्थितीत आता सध्याच्याच प्रमाणात लसीकरण सुरू ठेवल्यास ही लस शुक्रवारपर्यंतच पुरू शकणार आहे. त्यानंतर पुन्हा त्वरित लस उपलब्ध झाली तरच लसीकरण सुरळीत सुरू राहू शकणार आहे. अन्यथा अन्य जिल्ह्याप्रमाणे पुन्हा नाशिकलादेखील लसीकरणात खंड पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
इन्फो
दुपारनंतर लसीकरणासाठी रांगा
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे तसेच लस मिळणे बिकट होऊ लागल्याने नागरिकांनी दुपारी लस प्राप्त झाल्यानंतर लसीकरणासाठी रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे. सर्वच लसीकरण केंद्रांवर कमी-अधिक प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. ज्यांचा लसीचा पहिला डोस एक महिन्यापूर्वीच झाला आहे, असे नागरिकदेखील दुसऱ्या लसीसाठी घाई करीत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.