मानवाप्रमाणेच जनावरांनाही विविध आजारांची समस्या भेडसावत असते. बदलत्या ऋतुनुसार या जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून केले जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिवाळ्यापूर्वी लाळ खुरकूत या दुभत्या जनावरांना होणाऱ्या आजाराचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले. आता पावसाळा तोंडावर आल्याने जनावरांना फऱ्या, घटसर्प व शेळ्यांना पीपीआरचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी मार्च महिन्यातच शासनाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. अद्याप लस प्राप्त झालेली नाही.
-----------
जिल्ह्यातील जनावरांची एकूण आकडेवारी
गाय वर्ग- १००६५५२
म्हैस वर्ग- २३०७६१
शेळी व मेंढी- ९३७७३१
---------------
मार्च महिन्यातच मागणी नोंदविली
मोठी जनावरे व शेळ्या-मेंढ्यांसाठी मान्सून पूर्व लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील पशुंच्या संख्येच्या तुलनेत मार्च महिन्यात मागणी नोंदविण्यात आली असून, येत्या आठवड्यात लस प्राप्त होण्याची शक्यता आहे. लस मिळाल्यास कोरोना नियमांचे पालन करून लसीकरण हाती घेण्यात येईल.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
-----------------
अशा दिल्या जातात लसी
* पावसाळ्यातील आजार होऊ नये म्हणून दूध देणाऱ्या जनावरांना म्हणजेच गाय, म्हैस यांच्याबरोबर बैलांनाही घटसर्प, फऱ्याचे लसीकरण केले जाते.
* शेळ्या-मेंढ्यांना याच दरम्यान पीपीआरच्या लसी दिल्या जातात.
* पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांना आंतरविषारचे लसीकरण केले जाते.
-----------------
आता लसींच्या पुरवठ्याची प्रतीक्षा
लाळ खुरकूत लसीकरण गेल्या सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले आहे. आता मान्सून पूर्व फऱ्या व घटसर्पाचे लसीकरण करण्याची तयारी पशुसंवर्धन विभागाने पूर्ण केली असून, लस मिळाल्यावर कोरोनाचे नियम पाळून गावोगावी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.
-------------
जनावरांना पावसाळ्यात पायाच्या खुऱ्यात फोड येणे तसेच जिभेला फोड येण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच लसीकरण करणे गरजेचे आहे.
- त्र्यंबक दाभाडे, पशुपालक
-------------
लाळखुरकूत लसीकरणाने अनेक जनावरांचा जीव बचावला आहे. पशुसंवर्धन विभागाने कोरोना काळातही जनावरांचे लसीकरण पूर्ण केले त्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला.
- समाधान निकम, पशुपालक