जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या नियोजनामुळे जिल्ह्यात लसीकरणाने सुमारे २७ लाखांपेक्षा अधिकचा टप्पा गाठला आहे. गेल्या ४ तारखेला जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक ६५,५७० इतके लसीकरण झाले होते. आजवरचा हा उच्चांक असल्याने जिल्ह्यातील लसीकरणामधील उत्साह यामुळे दिसून आला. जास्तीत जास्त डोसेस उपलब्ध होत असल्यामुळेदेखील लसीकरणाची गती दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि. ७) जिल्ह्याला २ लाखांपेक्षा अधिक लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये २ लाख १६ हजार इतके कोव्हिशिल्ड तर ९,९२० इतकी कोवॅक्सिन लस प्राप्त झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नाशिक महापालिकेला यातील मोठा वाटा मिळणार असल्याने नाशिक शहरातील लसीकरणाची संख्यादेखील वाढण्यास यामुळे मदत होणार आहे. नाशिक महापालिकेला ७१ हजार इतक्या लसींचे डोस पुरविले जाणार आहे. अशाप्रकारची मोठी लस महापालिकेलादेखील प्रथमच उपलब्ध होणार आहे. शहरातील लसीकरण तसेच केंद्रांची संख्या लक्षात घेता नाशिक महापालिकेला अधिकधिक डोस मिळालेले आहेत. त्यामुळे महापालिकेने जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरण करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
महापालिकेला मिळणाऱ्या डोसची संख्या पाहता पुढील चार दिवस सलग लसीकरण सुरू राहू शकेल असेच नियोजन करावे अशा सूचना लसीकरण समन्वयक अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रांवर किमान २०० लसींचे डोस पोहचणार आहेत. त्यामुळे प्रलंबित लसीकरणाला वेग येणार आहे.
--इन्फो-
-- मालेगावची लस मिळाली नाशिकला
मालेगावमध्ये पुरेशा प्रमाणात लस खर्च होत नसल्याने आता मालेगावला मिळू शकणाऱ्या लसींचा काही भाग नाशिक महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे नाशिकमधील लसीकरणाची गती वाढणार आहे. मालेगावमध्ये लसीकरणाबाबत असलेला गैरसमज आणि नागरिकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद यामुळे लस कमी खर्च होत आहे. त्यामुळे येथील लस नाशिक महापालिकेला मिळालेली आहे.
--कोट--
अधिकाधिक लसीकरण सत्र आयोजित करून प्रत्येक केंद्रावर कमीत कमी २०० लस उपलब्ध करून द्यावी व पुढील चार दिवस महापालिकेच्या सर्व केंद्रांवर लस उपलब्ध असेल अशा असे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत असलेली शिल्लक लस, लोकसंख्या, झालेले लसीकरण, लसींची मागणी या बाबींचा विचार करून जिल्ह्यात लस वितरण करण्यात आले आहे.
- गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी, तथा लसीकरण समन्वयक.