नाशिक : कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर अनेक नागरिक आपण कोरोनापासून फुलप्रुफ झाल्याच्या आविर्भावात घराजवळच्या परिसरात विनामास्क हिंडत असल्याचे दिसून येते. मात्र, याबाबत कोरोनाची एकच लस नव्हे, तर दोन्ही लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे संपुष्टात येत नाही, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ डॉक्टर्सनी व्यक्त केले आहे.
सामान्य ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा आजारी नागरिकांच्या लसीकरणाला अद्याप एक महिनादेखील पूर्ण झालेला नाही. तरीदेखील काही नागरिक पहिल्या लसनंतरच आता कोरोनाचा धोका नाही, अशा भरवशावर विनामास्क फिरणे, गप्पाटप्पा मारत बसणे यासारखे प्रकार करु लागले आहेत. त्यामुळे एक लस घेतलेले अनेक नागरिकदेखील कोरोनाग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दोन लस घेऊन झाल्यानंतर आरोग्य केंद्रात कार्यरत असताना बाधा झाल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामागे दोन लस घेतल्यानंतरदेखील महिनाभराचा कालावधी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण होत नाहीत, हे शास्त्रीय कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दोन लसीनंतर महिना उलटल्यानंतरही कोणतीही दक्षता न घेता राहिल्यास कोरोना होणारच नाही, असेही नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, दोन लसींनंतर कोरोना झाला तरी त्याची तीव्रता मात्र कमी असल्याने कोरोना लसीचे दोन डोस आवश्यकच असल्याचेही मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
कोट
नागरिकांनी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसह कुणीही लस घेतल्यानंतर कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारकच आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर केवळ आपली प्रतिकारशक्ती वाढते, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे,
डॉ. अजीता साळुंखे, मनपा आरोग्य अधिकारी
-------
कोट
लसीेचे दोन डोस झाले तरी प्रत्येक नागरिकात अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण कमी अधिक असते. त्यामुळे दोन लसीनंतरही कोरोना होण्याची शक्यता नामशेष होत नाही. मात्र, दोन लसींनंतर कोरोना झालाच तरी तो जीवघेणा नसतो, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने लस घ्यावी.
डॉ. समीर चंद्रात्रे, आयएमए
--------
कोरोनाच्या दोन लसींनंतर एक महिना उलटून गेल्यानंतरही कोरोना होणारच नाही, याची खात्री देता येत नाही. मात्र, झाला तरी त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे लसीकरणाचे दोन डोस अत्यावश्यक आहेत.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी