नाशिक : शहरात लसीकरणासाठी शनिवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. शहरातील २९ लसीकरण केंद्रांपैकी केवळ २ केंद्रांवरच लस उपलब्ध असल्याने शेकडो नागरिकांना लस मिळू शकली नाही. रविवारीदेखील केवळ इंदिरा गांधी रुग्णालय आणि नाशिकरोडच्या खोले मळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावरच लस मिळू शकणार आहे.
जिल्ह्यात महानगरपालिकेची लसीकरणाची २९ केंद्रे आहेत; मात्र गुरुवारपासूनच महापालिकेकडील लसीचा साठा संपुष्टात आला होता. त्यामुळे मनपाच्या प्रशासनाने जिल्हा परिषदेकडून लस साठा मागविला. त्यातूनच शुक्रवारी आणि शनिवारी लस पुरवून वापरण्यात आल्या. आता रविवारी केवळ दोन रुग्णालयांमध्येच लसीकरण होऊ शकणार आहे. दरम्यान, शहरातील लसीकरणाच्या समन्वयासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूसंपादन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच सोमवारी अधिक प्रमाणात लससाठा मिळण्याची मनपा प्रशासनाला अपेक्षा असल्याचे डॉ. अजिता साळुंके यांनी सांगितले.
इन्फो
केवळ दुसरा डाेस
शहरातील अनेक नागरिकांना शुक्रवारी आणि शनिवारीदेखील बहुतांश केंद्रांवर लसचा पहिला डोस मिळालाच नाही. उपलब्ध लस प्राधान्याने केवळ दुसऱ्या डोस घेणाऱ्यांनाच उपलब्ध करून दिली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.