नाशिक : कोरोना महामारीचे दुष्टचक्र तोडायचे असले तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. भूतानमध्ये जवळपास ९३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने भूतानमध्ये कोरोनाचा उद्रेक थांबला आहे. कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेशी यशस्वी लढा देऊन कोरोनामुक्त व्हायचे असेल तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. धनंजय केळकर यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाद्वारे आयोजित ‘शब्दजागर’ या ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘कोरोनाच्या चक्रव्यूहाचा भेद’ या विषयावर त्यांनी रविवारी (दि.३) पुष्प गुंफले. पुणे येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख, जलनेतीकार डॉ. केळकर बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. केळकर म्हणाले की, मी कोरोना आजारावर उपचार करणारा कोणी स्पेशालिस्ट डॉक्टर नाही. मात्र, आम्ही मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून कोरोना शत्रूशी योग्य पद्धतीने लढा देत अनेक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. ६५ ते ७० हजार रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्ण इतरांच्या संपर्कात येता कामा नये यासाठी गृहविलगीकरण हा महत्त्वाचा भाग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुढे आणल्याचे डॉ. केळकरांनी आवर्जून नमूद केले. यावेळी डॉ. केळकर म्हणाले की, देश कोरोनामुक्त झालेला पाहायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचे हे दुष्टचक्र केवळ लसीकरणानेच खंडित होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय कोरोना चक्रव्यूहाचा भेद यासंदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक सावानाचे बालविभाग प्रमुख गिरीश नातू यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी करून दिला, तर आभार अर्थसचिव उदयकुमार मुंगी यांनी मानले.
इन्फो
एक हजार बालकांवर यशस्वी उपचार
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून आता लहान बालकेदेखील या दुष्टचक्रात अडकत चालली आहेत. तिसरी लाट ही बालकांसाठी चितांजनक असल्याचे त्यांनी सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जवळपास १००० हजार बालकांवर यशस्वी उपचार करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले आहे. बालकांवरील उपचारासाठी त्यांनी चेस्ट सीटी स्कॅन ही पद्धती वापरून योग्य उपचार केले आहेत.
इन्फो
पंचसूत्रीचा वापर गरजेचा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब आहे. मात्र, आपण प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले, तर कोरोनामुक्त भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. सूर्यप्रकाश, मोकळी हवा, व्हिटॅमीन-डी, जलनेती, व्यायाम या पंचसूत्रीची आपल्या दैनंदिन जीवनात अंमलबजावणी केल्यास कोरोनामुक्तीचा दिवस दूर नसल्याचे डॉ. केळकरांनी सांगितले.