यासंदर्भात किन्नरांच्या आखाड्याच्या महंत पायलानंद गिरी यांनी सांगितले की, नाशिकमध्ये सुमारे दीड हजार किन्नर आहेत, त्यांच्याकडे आधारकार्ड नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नोंदच होत नाही. राज्यातील मुंबईसह काही भागात सेवाभावी संस्थांच्या पुढकाराने किन्नरांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, नाशिकमध्ये लसीकरण झालेले नाही. महापालिकेशी आमचा संपर्क सुरू आहे, परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. किन्नरांच्या इतक्याच संख्येने नाशिकमध्ये वाघ्या आणि मुरळी आणि तसेच काही घटकदेखील आहेत. त्यांच्याकडेसुध्दा आधारकार्ड नसल्याने लसीकरण झाले नाही.
इन्फो...
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या लसीकरणाचा प्रश्नदेखील निर्माण झाला होता. मात्र, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आसावरी देशपांडे यांनी नाशिक महापालिकेशी संपर्क साधल्यानंतर त्यांना पन्नास महिलांचा एक स्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देहविक्री करणाऱ्या ज्या महिलांकडे आधारकार्ड होते, त्यांना लसीकरणात अडचणी आल्या नाहीत. मात्र, आता ज्यांचे लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी मनपाने स्लॉट उपलब्ध करून दिल्याचे आसावरी देशपांडे यांनी सांगितले. किन्नरांच्या लसीकरणासाठीदेखील अशाच प्रकारे स्लॉटमध्ये लसीकरण करून देऊ असेही त्या म्हणाल्या.
कोट..
नाशिकमध्ये किन्नर आणि काही वंचित घटकांचे लसीकरण केवळ आधारकार्ड नसल्याने थांबले असेल तर त्याची दखल घेतली जाईल आणि त्यांच्या लसीकरणाची सोय केली जाईल.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका