दिंडोरी : तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्या नियोजनानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली.
आतापर्यंत २४२ नागरिकांनी कोविडची लस घेतली असून तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान, तळेगांव दिंडोरी हे गाव दिंडोरी तालुक्यात ग्रामीण भागात येत असून केवळ पोस्ट ऑफिसचा पिनकोड हा पंचवटी, मेरी कॉलनीशी जोडला असल्याने या केंद्रावर लसीकरणासाठी म्हसरूळ , मेरी, पंचवटी परिसरातील नागरिक येत आहेत. तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजूबाजूची १५ ते २० गावे असून या गावातील नागरिकांना आधी लस देणे आवश्यक आहे.त्यामुळे नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी महानगर पालिका क्षेत्रातील केंद्रांवर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.(१३ दिंडोरी १) तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम राबविताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.