नाशिक : भारतातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांचे लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याने उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘विशेष बाब’ म्हणून १ जूनला लसीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. परदेशी शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना जायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण मंगळवार, १ जूनला ‘विशेष बाब’ म्हणून केले जाणार आहे. यासंदर्भात लसीकरण मोहिमेचे घटना व्यवस्थापक तथा उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी सांगितले की, महाकवी कालिदास कलामंदिर येथे १ जूनला दुपारी १२ वाजेपासून लसीकरण केले जाणार आहे. यासाठी २० किंवा डीस १५० फॉर्म, ॲडमिशन निश्चित झाल्याचे पत्र, आयकार्ड आणि पासपोर्ट परवाना सोबत आणावा लागणार आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे केले आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात विचारणा केली होती. पुणे व मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरणाअभावी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
--इन्फो--
शंभर विद्यार्थ्यांना ‘कोविशिल्ड’ लस
परेदशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नाशिकमध्ये अंदाजे शंभर इतकी आहे. अमेरिका, युरोप व इतर बहुसंख्य देशांमध्ये ‘कोविशिल्ड’ ही लस मान्यताप्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. लसीकरणाकरिता आवश्यक असणारी लस नाशिक महानगरपालिकेला जिल्हा लस भांडार येथून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.