नाशिक : केंद्र शासनाच्या आदेशामुळे गत महिनाभर रविवारसह सर्व शासकीय सुट्यांना लसीकरण सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, सार्वजनिक सुटीच्या दिवशी लसीकरणावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुटी मिळावी, या उद्देशाने रविवारी महानगरातील कोणत्याही लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाही. त्यामुळे रविवारचा दिवस नागरिकांचा लसीकरणविरहित जाणार आहे. शनिवारीदेखील केवळ ५ केंद्रांवरच लसीकरण झाल्यामुळे शेकडो नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागले.
गत महिनाभरापासून दररोज शासकीय सुट्यांनादेखील लसीकरण करण्यात आले होते. मात्र, या रविवारी शासकीय सुटीमुळे लसीकरण करण्यात येणार नसल्याचे मनपातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी कोणत्याच केंद्रांवर नागरिकांनी लसीकरणासाठी येऊ नये, असे आवाहनदेखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारीदेखील शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय, खोले मळा, सातपूर आणि पंचवटीतील मायको दवाखाना तसेच सिडकोतील नागरी आरोग्य केंद्र या केवळ पाच केंद्रांवरच लसीकरण करण्यात आले. शहरातील साठपैकी ही केवळ पाच केंद्रेच सुरू ठेवण्यात आल्याने नागरिकांची प्रचंड निराशा झाली. तसेच या केंद्रांवरदेखील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी झुंबड उडवली होती. त्यामुळे विनानोंदणी आलेल्या सर्वच नागरिकांना लसीकरणाशिवायच परतावे लागले.