सिन्नर : तालुकास्तरावर काम केलेल्या नेत्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या विकास आघाडीला धोबीपछाड देत वडांगळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदच्या सदस्य वैशाली खुळे यांचे पती दीपक खुळे, पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, डॉ. जाकीर शेख यांनी विकास आघाडी स्थापन करून आमदार माणिकराव कोकाटे समर्थक सुदेश खुळे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांच्या बळावर सुदेश खुळे गटाने निवडणुकीत सर्व ९ जागा जिंकल्या. ग्रामविकासच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.ग्रामविकासचे वॉर्डनिहाय निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : वॉर्ड क्र. १ मध्ये मीनल विक्रम खुळे यांनी पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे यांच्या स्नुषा शीतल योगेश खुळे यांचा पराभव केला. वॉर्ड क्र. दोनमध्ये योगेश घोटेकर हे दीपक खुळे यांचा पराभव करत जायंट किलर ठरले. याच वॉर्डात गायत्री खुळे यांनी सुनीता खुळे यांचा पराभव केला. वॉर्ड तीनमध्ये नानासाहेब खुळे यांनी विकासकामांच्या जोरावर रफिक शेख यांना धोबीपछाड दिली, तर योगीता भावसार व लता गडाख यांनी अनुक्रमे मनीषा बकरे व सुनंदा खुळे यांचा पराभव केला. वॉर्ड क्र. चारमध्ये राहुल खुळे यांनी वाळू खुळे यांना तर अनिता क्षत्रिय व हर्षला खुळे यांनी वर्षा खुळे व तनजीला शेख यांचा पराभव केला. ग्रामविकासचे रवी माळी व अमोल अढांगळे अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.