संजय शहाणे -इंदिरानगर : अवैधरीत्या सावकारी करणारा संशयित आरोपी वैभव यादवराव देवरे याला इंदिरानगर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तो पहिल्या गुन्ह्यात पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत असून, त्याच्याविरुद्ध शनिवारी (दि. १३) पुन्हा व्याजापोटी मोठी रक्कम उकळून फसवणूक केल्याचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन अशोक सोनवणे (रा. कमोदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सोनवणे यांचा मित्र दीपक साळुंखे यास कार खरेदी करावयाची असल्यामुळे त्याने दयाराम खोडे यांच्याकडून कार (एमएच ४८ अेसी ५७३६) ५ लाखांत खरेदी केली. यावेळी १ लाख रुपये साळुंखे याने खोडे यांना रोख स्वरूपात दिले होते. दरम्यान, पैशांची आवश्यकता असल्याने सोनवणे यांच्या अजून एका मित्राद्वारे देवरे याच्याशी ओळख झाली. तो व्याजाने पैसे देतो, अशी माहिती त्यांना मिळाली होती. यामुळे सोनवणे यांनी देवरेशी संपर्क साधला. त्याने १० टक्के व्याजदाराने दोन टप्प्यांत धनादेशाद्वारे प्रत्येकी २ लाख, असे एकूण ४ लाख रुपये दिले. त्या मोबदल्यात कार त्याच्याकडे गहाण ठेवून घेतली. चार लाखांची रक्कम त्यांनी खोडे यांना दिले. २०२१ साली साळुंखे याने देवरे यास ४ लाख रुपये परत केले. यानंतर घरातील सोने सोनाराकडे गहाण ठेवून पुन्हा साळुंखे याने ९ लाख रुपये व्याजापाेटी देवरे यास दिले होते.
१० लाखांचे कर्ज देऊन फ्लॅट बळकावलानवीन सोनवणे यांनी वैभव देवरे याच्याकडून १० लाख रुपये व्याजाने घेतले. त्या मोबदल्यात त्यांचे वडील अशोक सोनवणे यांच्या नावे असलेला फ्लॅट देवरे याच्याकडे गहाण ठेवून दस्तऐवज करून दिले होते. त्यानंतर व्याजापोटी १९ लाख रुपये देवरे याला धनादेशाद्वारे सोनवणे यांनी दिले; मात्र तरीसुद्धा देवरे याने फ्लॅटची कागदपत्रे, करारनामा रद्द केला नाही व फ्लॅट बळकावला. पतसंस्थेचे कर्ज भरायचे असल्याने सोनवणे यांनी पुन्हा देवरे याच्याकडून ४ लाख रुपये व्याजाने घेतले. या व्याजाची रक्कम ९ लाख झाल्याचे सांगून ४५ लाख रुपयांची मागणी केली होती, पैसे दिले नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देवरे याने सोनवणे यांना दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बळजबरीने २८ लाखांची वसुलीसंशयित आरोपी देवरे याने अवैधरीत्या सावकारी करत व्याजापोटी फिर्यादी सोनवणे यांच्याकडून २८ लाख रुपये बळजबरीने वसूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वैभव देवरे याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात अवैधरीत्या सावकारी करत व्याजाची रक्कम वसूल करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी दिली.