नाशिक : वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवित, समकालीन प्रश्नांना वाचा फोडली. समाज सक्षम होण्यासाठी त्यांनी आपल्या गीतांमधून जनजागृती केली, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभागप्रमुख व प्रसिद्ध संगीतकार डॉ.संजय मोहड यांनी केले.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने रविवारी (दि. १७) मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित लोकशाहीर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय, स्वागताध्यक्ष नितीन भुजबळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ.मोहड म्हणाले, वामनदादांनी आयुष्यभर चळवळीला बळकटी देण्याचे काम केले. आजच्या युवकांनी त्यांच्याप्रमाणेच फुले-शाहू-आंबेडकर चळवळ सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध साहित्यिक प्रा.गंगाधर आहिरे आणि महेश भारतीय यांनी ‘वामनदादांचे कर्तृत्व आणि वर्तमान प्रबोधनाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले.
वामनदादा आयुष्यभर बुद्ध-आंबेडकरांच्या विचारात रमले. खेडोपाडी आंबेडकरांचे विचार पाेहोचविले. सांस्कृतिक दहशतवादाविरोधात आंबेडकरवाद उभा करण्याचे आवाहन यावेळी प्रा.गंगाधर आहिरे यांनी केले. वामनदादांचे गाणे घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती भारतीय यांनी दिली.
तिसऱ्या सत्रात कवी संविधान गांगुर्डे, विशाल नंदागवळी, रोहित जगताप, शुभम बचुटे, निखिल दोंदे, शिशुपाल गवई आणि दीपक दोंदे यांनी परिवर्तनाच्या कविता सादर केल्या. या कवितांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच शाहीर मेघानंद जाधव (औरंगाबाद) यांनी सादर केलेल्या वामनदादांच्या गीतांना उपस्थितांनी दाद दिली. यावेळी भारिप नेते डॉ.संजय जाधव, बाळासाहेब शिंदे, रोहित गांगुर्डे, मिहीर गजभिये, ॲड.विनय कटारे, दीपक पगारे, विशाल यडे, विजय साळवे, सूरज भालेराव, कोमल पगारे, रोहिणी दोंदे, राहुल नेटावटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नितीन भुजबळ यांनी, तर सूत्रसंचलन कोमल पगारे यांनी केले. आभार गजबे यांनी मानले.