नामपूर/द्याने : बागलाण तालुक्यातील निताणे येथे गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या पाच ते सहा वानरांपैकी एका आजारी वानराचा मृत्यू झाला. वानराच्या मृतदेहावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व गावातील नागरिकांनी रविवारी हनुमान मंदिराजवळ अत्यंत श्रद्धेने धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार केला. २५० गावांतील युवकांनी मुंडन करून सुतक पाळले. या वानरला मधमाशांनी चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सव्वा मीटर भगवा कपडा आणून वानराच्या मृतदेहावर टाकण्यात आला. गावाच्या वेशीवर वानराच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यविधी पार पडला. वानराला अखेरचा निरोप देण्यासाठी वानरांचा समूहसुद्धा उपस्थित होता. संपूर्ण गावाने यावेळी दुखवटा पाळला. दुकाने बंद ठेवण्यात आली होती. प्राणिमात्रावर प्रेम करा हा अनोखा संदेश देणाऱ्या निताणे येथील ग्रामस्थांची भूतदया परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी रामचंद्र देवरे, राजेंद्र देवरे, सरपंच अरुणाबाई पवार, प्रवीण अहिरे, प्रदीप देवरे, वसंत पवार, भूषण देवरे, अशोक देवरे, प्रशांत पवार, संभाजी देवरे, दिनेश देवरे, देवेंद्र पवार, विश्वास अहिरे, केशव देवरे, दिलीप देवरे, सुनील देवरे, विकास देवरे, हेमंत देवरे, विजय देवरे, वसंत पवार, राकेश वाघ, विनायक देवरे, मोहन सोनवणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
निताणे येथे वानराचा पंचक्रिया विधी
By admin | Published: August 29, 2016 12:31 AM