नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पांडवलेणीच्या डोंगराच्या मध्यावर मंगळवारी (दि. १७) आगीचा भडका उडाला. डोंगरावर पेटलेला वणवा विझवायला वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आग पारंपरिक झोडपणी पद्धतीने विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते.
पांडवलेणी डोंगरावर असलेल्या जंगलाला राखीव वनक्षेत्राचा दर्जा असून, हे वनक्षेत्र नाशिक वनविकास महामंडळाच्या अखत्यारित येते. पर्यटकांच्या नेहमीच पसंतीच्या असलेल्या या डोंगराच्या नाशिक शहराच्या बाजूने असलेल्या भागात वणवा भडकला. सूर्यास्तानंतर येथील त्रिरश्मी लेणीमध्येही पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे रात्री या भागात कोणी पर्यटक असण्याचा प्रश्न नाही. तरीही डोंगराच्या पाठीमागील बाजूने खातप्रकल्पाकडून कोणी फिरस्त्याने घुसखोरी करत धूम्रपान करताना आगपेटीची काडी किंवा थोटके फेकले असावे, ज्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आगीची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे आठ ते दहा कर्मचारी डोंगराच्या दिशेने रवाना झाले. तातडीने डोंगरमाथा गाठून झाडाच्या ओल्या फांद्या तोडून त्याची झोडपणी तयार करत आग विझवायला सुरुवात केली. रात्री ११ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. यामध्ये वनपाल, वनरक्षक, वनमजुरांनी सहभाग घेतला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. वाळलेले गवत वेगाने पेटत जात होते. त्यामुळे आग विझविण्यास विलंब लागला. या आगीत मोठ्या प्रमाणात गवत जळून राख झाले, तर काही लहानमोठ्या झाडांनाही झळ पोहोचली.