आगीने रौद्ररूप धारण केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नांदूरशिंगोटे येथील एकलव्यनगरमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी डोंगराकडे धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. याबाबत सिन्नर व संगमनेर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोनवर कळविल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्वरित वाऱ्या डोंगराकडे धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, रात्रीची वेळ व सोसाट्याचा वारा सुटलेला असल्याकारणाने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आदिवासी बांधवांनी आग विझविल्याशिवाय घरी जाणार नाही, असे सांगून रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र, डोंगरावरील जनावरांचा चारा पूर्ण जळून खाक झाला.
आदिवासी बांधवांनी जिवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी रात्र जागून काढली. यावेळी वन विभागाचे कर्मचारीही त्यांच्या सोबत होते. यावेळी एकलव्यनगर येथील देवराम आगीवले, शिवराम आगीवले, भीमराव पथवे, धर्मा आगीवले, विश्वनाथ आगीवले, दत्तू पथवे, बंडू पथवे, सुरेश गिऱ्हे, भाऊसाहेब गिरी, सागर गिरी आदींसह परिसरातील आदिवासी बांधवांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.