संकेत शुक्ल, नाशिक: रस्त्यावर पडलेले खड्डे... कसारा घाटात कोसळलेली दरड आणि महामार्गावर कायम होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदारांना वंदे भारत रेल्वेने प्रवास करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागले. वाहतूककोंडीमुळे जनता त्रस्त झालेली असताना त्याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसल्याने त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी नाराजीचा सूर आळवला.
त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात सोमवारी (दि.८) बैठक आयोजीत करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. लोकसभा निवडणूक तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. ७) पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच आमदारांनी मुंबईला जात असताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. आ. कोकाटे यांनी याप्रश्नी संबंधित विभागांना धारेवर धरीत महामार्गावर लावण्यात येणाऱ्या मोठमोठ्या ट्रेलरमुळे वाहतुकीची कोंडी होत असून त्या ठिकाणी पार्किंगला परवानगीच कशी मिळते असा प्रश्न उपस्थित केला.
नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे तसेच ठिकठिकाणी संथगतीने सुरू असलेल्या कामांवरून लाेकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. महामार्गावरून प्रवासासाठी तासनतास लागत असल्याने वाहने मुंबईत सोडून रेल्वेने आलो आहोत. सोमवारी (दि. ८) सकाळी १० वाजता मुंबईत बैठक असून रेल्वेनेही जाणे शक्य होणार नसल्याची व्यथाच लाेकप्रतिनिधींनी व्यक्त केली. प्रवाशांच्या व्यथा लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत का बोलविले नाही, असा जाबदेखील लोकप्रतिनिधींनी विचारला.
यावर पालकमंत्री भुसे यांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत भिंवडी बायपासचे काम पूर्ण केले जाईल. तेथे १२ लेनचा रस्ता असून पोलिसांच्या मदतीला १०० अतिरिक्त कर्मचारी तैैनात केल्याची माहिती भुसे यांनी दिली. यासंदर्भात यंत्रणेला सुचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
नाशिक-मुंबई महामार्गाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.८) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलविली आहे. या बैठकीची माहिती मंत्रालय स्तरावर आधी मिळाली असती तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आली असती, ठाणे जिल्हाधिकारी यांनीही यासंदर्भात बैठक बोलावली असून मंत्रालयात उद्या होणाऱ्या बैठकीत मार्ग काढला जाईल.- दादा भुसे, पालकमंत्री