लोकमत न्यूज नेटवर्कवरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील शेतात भुईमुंग निंदणी, खुरपणी करतांना बुधवारी भरदुपारच्या सुमारास महिलांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून, पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकरी दशरथ उफाडे यांनी केली आहे. वरखेडा, आंबेवणी, परमोरी, राजापूर, अवनखेड, लखमापूर , करंजवण व शिवनई (आंबेहिल)या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार होत असुन कुत्रे, शेळ्या व लहान वासरे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून फडशा पाडला आहे. मागील आठवड्यात देखील या परिसरातील राजापूर येथील शेतकऱ्यांचे दोन बोकड फस्त केले होते. बुधवारी शेतात काम करणाऱ्या महिलांनी बिबट्याला पाहिल्याने भयभित झाले.पावसाळ्यात शेतात अनेक कामे असून ,बिबट्याच्या दहशतीने शेतात काम करणे कठिण झाले आहे. यामुळे ग्रामस्थामध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपुर्वी नाशिक -कळवण मार्गवरील पुलांवर बिबट्याने दर्शन दिले होते. या परीसरात उसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने, अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे .याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. या घटनेची माहिती वरखेडा येथील शेतकरी दशरथ उफाडे यांनी वनविभागाला कळविल्या नंतर वनविभाचे वनक्षेत्रपाल सुनिल वाडेकर यांच्या मार्गदर्शानाखाली वनपाल अनिल दळवी, वनरक्षक एस जी मोगरे , एस पी चौरे, रमेश झुरडे या कर्मचारी वर्गाने घटनास्थळी येवून बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पावलांचे ठसे घेवून पंचनामा केला आहे.
वरखेडा परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:26 AM