२१ जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे ४० हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या मोहिमेत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
नावीन्यपूर्ण कार्यक्रम म्हणून देवारपाड्यातील युवा शेतकरी कमलेश घुमरे यांनी तयार केलेल्या कपाशी टोकण यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कमलेश घुमरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, पंचायत समिती सभापती यांनी कृषिदिनाचे महत्त्व व विविध योजनांची माहिती दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृषी समिती स्थापन करणे, सरकारी कार्यालयात शेतकरी सन्मान, जागतिक बाजारपेठ, शेतकरी जीवनमान उंचावणे याविषयी माहिती दिली. त्यानंतर पीक स्पर्धा विजेत्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. त्यात ताराबाई तुवर व आनंदराव देशमुख यांना प्रथम पारितोषिक वितरण करण्यात आले. पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, लकी गिल, भिकान शेळके उपस्थित होते.